बिल्डरच्या फायद्यासाठी इमारती अतिधोकादायक ठरवण्याचा नवा घोटाळा

वर्तकनगरात १६० गोरगरीब कुटुंबांना बेघर करण्याचा डाव,शासनाचा आदेश धाब्यावर,म्हाडाचे नियम बाजूला सारून पुनर्वसन.

ठाणे :  ठाणे शहरातील वर्तकनगर येथे सुस्थितीत असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लाॅबीकडून आखण्यात आला आहे. रहिवाशांनी म्हाडाच्या नियमानुसार क्षेत्रफळाची मागणी केल्यानंतर वापरण्यायोग्य असलेल्या दोन इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या “सी १ या श्रेणीत टाकण्यात आल्या असून यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला,या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मधूर राव,शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे व वर्तक नगर येथील म्हाडाच्या ४५ व ४७ मधील रहिवासी उपस्थित होते.
वर्तकनगर परिसरात म्हाडाच्या ७५ इमारती आहेत. या इमारती जुन्या असल्याने या इमारती पाडून नव्याने गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  क्रमांक ४५ व ४७ या  इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी पुनित बिल्डर्सने पुढाकार घेतला आहे. मात्र, इतर ठिकाणी रहिवाशांची फसवणूक होत असल्याने रहिवाशांनी म्हाडाने घालून दिलेल्या नियमानुसार क्षेत्रफळ देण्यात यावे, वाजवी दरानुसार घरभाडे द्यावे, अनामत रक्कम द्यावी,  अशी मागणी बिल्डर्सकडे केली होती. मात्र, बिल्डर प्रतिक पाटील यांनी ४३० चौरस फूट क्षेत्रफळ देणार असल्याचे सांगितले. त्यावर रहिवाशांनी  ४८४ चौ. फूट क्षेत्रफळ देण्याबाबतचे म्हाडाकडून पत्र  आणून सादर केल्यानंतर बिल्डर्सने रहिवाशांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. बिल्डरने ठामपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दोन्ही सुस्थितीतील आणि जुजबी दुरूस्तीनंतर वापरण्यायोग्य असलेल्या इमारती स्ट्रक्चर ऑडिटमध्ये अतिधोकादायक ठरवून ४८ तासात रिकाम्या करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे सदर इमारती या म्हाडाने विकसित केलेल्या असल्याने म्हाडाच्या नियमावलीनुसार सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय इमारती रिकाम्या करता येत नाहीत. तरीही सदर इमारती रिकाम्या करून १६० कुटुंबियांस बेघर करण्याचा कट बिल्डरने आखला आहे, असे चव्हाण आणि राव यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या इमारती धोकादायक ठरवून आम्हाला बेघर करण्यापूर्वी नव्याने स्ट्रक्चर ऑडिट करावे, म्हाडाच्या नियमानुसार सर्व परवानग्या मिळवूनच इमारत रिकामी करावी, घरभाडे , अनामत रक्कम देण्यात यावी, ४८४ चौरस फूट क्षेत्रफळाचे  घर द्यावे, अन्यथा आम्ही या इमारती रिकाम्या करणार नाही, असा इशाराही चव्हाण आणि राव यांच्यासह
सर्व रहिवाशांनी दिला. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

 326,109 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.