पोलिसांच्या विजयात रोहित, श्रीकांत, सचिन चमकले

मुंबई पोलिसांच्या ब संघाने टाईम ऑफ इंडियाचा २२८ धावांनी दणदणीत पराभव करत ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटातील आपली आगेकूच कायम राखली आहे.

ठाणे : रोहित पोळ, श्रीकांत लिंबोळेची शतकी खेळी, सचिन मोरेच्या पाच विकेट्स हे मुंबई पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडिया संघावर मिळवलेल्या मोठया विजयाचे वैशिष्ट्य ठरले. मुंबई पोलिसांच्या ब संघाने टाईम ऑफ इंडियाचा २२८ धावांनी दणदणीत पराभव करत ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटातील आपली आगेकूच कायम राखली आहे.
दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळलेल्या सामन्यात रोहित आणि श्रीकांतच्या शतकांच्या जोरावर मुंबई पोलिसांनी ३५ षटकात ४ बाद ३४३ धावांचा डोंगर उभा केला. रोहितने ८४ चेंडूत १४८ आणि श्रीकांतने ७० चेंडूत १२१ धावा करत तिसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी करत मोठया धावसंख्येचा पाया रचला होता. टाईम्स ऑफ इंडिया संघाकडून प्रथमेश दुभाषीने २, प्रशांत जाधव आणि असिफ सय्यदने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
मोठया धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या टाईम्स ऑफ इंडियाला २५.४ षटकात अवघ्या ११५ धावांवर गुंडाळत मुंबई पोलिसांनी निर्णायक फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. टाईम्स ऑफ इंडियाच्या फलंदाजीला खिंडार पाडताना सचिनने ५.४ षटकात १७ धावांच्या मोबदल्यात अर्धा संघ गारद केला. योगेश पाटीलने २ आणि शतकविर रोहितने एक विकेट मिळवली. पराभूत संघाच्या अनिर्बंन चौधरी (२३),सेंधीलकुमार (१४) आणि ऋषिकेश पडवळचा (१२) अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या नाहीत.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पोलीस : ३५ षटकात ४ बाद ३४३ ( रोहित पोळ १४८, श्रीकांत लिंबोळे १२१,प्रथमेश दुभाषी ५-४९-२, प्रशांत जाधव ४-४३-१, असिफ सय्यद ३-३५-१) विजयी विरुद्ध टाईम्स ऑफ इंडिया : २५.४ षटकात सर्वबाद ११५ (अनिर्बंन चौधरी २३, सेंधीलकुमार १४, ऋषिकेश पडवळ १२, सचिन मोरे ५.४-१७-५, योगेश पाटील ४-२१-२, रोहित पोळ ३-१७-१).

 23,198 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.