सुप्रिमो चषकाची षटकारबाजी उद्यापासून


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन, हिंदुस्थानातील तगड्या १६ संघांचा सहभाग
मुंबई : टेनिसची आयपीएल अर्थातच सुप्रीमो चषकासाठी सांताक्रुझ कालिना येथील एअर इंडिया स्पोर्टस्चे स्टेडियम अक्षरशा दिवाळीसारख्या रोषणाईने सजले असून पुढील पाच दिवस हे स्टेडियम षटकार-चौकारांच्या आतषबाजीने न्हाऊन निघणार आहे. भारतातील अव्वल १६ संघांचा समावेश असलेला सुप्रीमो चषकाचा पॉवरफुल-धमाकेदार खेळ उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडेल.
सध्या भारतात आयपीएलचे वादळ असले तरी उद्या बुधवारपासून सुप्रीमो चषकाच्या निमित्ताने एअर इंडिया स्पोर्टस् स्टेडियमवर षटकार-चौकारांची त्सुनामी येणार आहे. आयपीएलच्या धर्तीवरच टेनिस क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील गुणवत्ता हेरून काढण्यासाठी आमदार विभागप्रमुख संजय पोतनीस आणि आमदार विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांच्या संकल्पनेतून गेली दहा वर्षे सुप्रीमो चषकाचे अभूतपूर्व आयोजन केले जात आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल असे देखणे आणि भव्यदिव्यरित्या आयोजित केल्या जाणार्‍या या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला पक्षप्रमुखांसह युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, भारताचा हॉकीचा दिग्गज खेळाडू धनराज पिल्ले, सिनेस्टार सुनील शेट्टी आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांची उपस्थिती लाभणार आहे.
उमर विरुद्ध एसएससीसी यांच्यात उद्घाटनीय सामना
यंदाच्या सुप्रीमोमध्ये भारतातील तगडे १६ संघ खेळणार असून उद्घाटनीय सामना उमर इलेव्हन विरुद्ध एसएससीसी डोंबीवली यांच्यात रंगणार आहे. दुसरा सामना उरणच्या गावदेवी गावठण आणि रायगड ट्रायडेंट यांच्यात खेळविला जाईल. या दोन्ही सामन्यातील विजेत्यांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगेल.
अवघे स्टेडियम लाल-पांढरे
सुप्रीमो चषकाच्या बोधचिन्हानूसार स्टेडियमला लाल-पांढर्‍या रंगाने सजवण्यात आले आहे. स्टेडियमच्या गेटपासून आसनापर्यंत, कंदिलापासून रोषणाई पर्यंत सारेच लाल-पांढरे करण्यात आले आहे.
१४ कॅमेरे टिपणार फटकेबाजी
सुप्रीमो चषकाचे थेट प्रक्षेपण आयपीएलप्रमाणेच उत्कृष्टरित्या थेट प्रक्षेपित केले जावे म्हणून एक-दोन नव्हे तर तब्बल १४ कॅमेर्‍यांच्या नजरेतून सुप्रीमोची फटकेबाजी टिपली जाणार आहे. यासाठी अत्युच्च दर्जाचे ४ ब्रॉॅडकास्ट कॅमेरेही ठेवण्यात आले आहेत. याच कॅमेर्‍याच्या माध्यमातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुप्रीमो ट्रॉफी आणि ७०७० स्पोर्टस् या दोन यूट्युब चॅनेलवरून दाखविले जाणार आहे.
भाग्यवान प्रेक्षकाला दररोज आयफोन

आपल्या अभूतपूर्व आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेत दररोज किमान २५ हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक सुप्रीमोची षटकारबाजी पाहायला येतात. यापैकी एका भाग्यवान प्रेक्षकाला दरदिवशी एक आयफोन दिला जाणार आहे. फक्त प्रेक्षकाला आपल्या कोणत्याही ओळखपत्राची झेरॉक्स गेटवर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकावी लागणार आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर लकी ड्रॉद्वारे एका भाग्यवान आयफोनची भेट दिली जाईल.
षटकाराला झेलणार्‍या प्रेक्षकालाही बक्षीस
सु्प्रीमोमध्ये मोठ्या संख्येत षटकारबाजी होते. फलंदाजाच्या बॅटीतून निघणार्‍या षटकाराला टिपणार्‍या प्रेक्षकालाही आयोजकांनी बक्षीसे ठेवली आहेत. ही बक्षीसे प्रेक्षकाला ताबडतोब दिले जाणार आहे. ही बक्षीस अमर्याद आहेत. हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांना सुप्रीमोचा आस्वाद लुटता यावा म्हणून पाच हजार क्षमतेची गॅलरीही उभारण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे विभागात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आयोजकांनी सशुल्क पोलीस संरक्षणही मागितले आहे.
मालिकावीराला मारुती एक्सप्रेसो
सुप्रिमो चषकाचा विजेता ११ लाखांचा रोख पुरस्कार पटकावेल, पण स्पर्धेच्या मालिकावीराला मारुतीची एक्सप्रेसो ही मॉडेल दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला यमाहा फॅसिनोज या स्कूटी दिल्या जातील.
मराठी- हिंदीसह मालवणीही कॉमेंट्री
सुप्रीमोच्या समालोचनासाठी क्रिकेटविश्वातील सहा खणखणीत आवाजाच्या समालोचकांची निवड करण्यात आली आहे. एकूण चार भाषांमध्ये समालोचन केले जाणार असून हिंदी इंग्रजी भाषेत हरीश पंड्या, मराठीत आयपीएलफेम कुणाल दाते, चंद्रकांत शेट्ये, मनीष पाटील आणि प्रशांत अदावडेकर तर मालवणी भाषेत बादल चौधरी यांचे खुमासदार आणि भन्नाट समालोचन स्पर्धेच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. या स्पर्धेला प्रसन्ना संत आणि विनीत देव हे निवेदन करतील. तसेच सामन्यांचे स्कोअरिंग संजय म्हात्रेंसह प्राजक्ता देसाई आणि सोनम चव्हाण या करतील.
अनुभवी पंचांचीही फौज
स्पर्धेदरम्यान अचूक आणि उत्कृष्ट पंचगिरी व्हावी म्हणून सतीश कुरूप, करुणाकर कोटियन, पीसी पाटील हे अनुभवी पंच मैदानात दिसतील. तसेच पंचांच्या निर्णयाबाबत आक्षेप घेण्यासाठी डीआरसही ठेवण्यात आले आहे. म्हणजेच खेळाडूंना स्टंपिंग, रनआऊटसारख्या वादग्रस्त निर्णयासाठी तिसर्‍या पंचाचीही मदत लाभू शकेल.

 113 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.