सिद्धांत, साहिलची नाबाद शतकी भागीदारी

साहिलने १६ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारानिशी झळकवलेले स्पर्धेतील पहिले अर्धशतक हे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

ठाणे : सलामीवीर साहिल गोडे आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सिद्धांत सिंगच्या नाबाद १०१ धावांच्या शतकी भागीदारी मुळे गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने महाराष्ट्र क्रिकेट क्लबचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमियर लीग-मुख्यमंत्री चषक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. साहिलने १६ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारानिशी झळकवलेले स्पर्धेतील पहिले अर्धशतक हे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र क्रिकेट क्लबने २० षटकात ८ बाद १६३ धावांचे तगडे आव्हान उभे केले. शशांक मेस्त्री (३७), करण नायडू (३६) आणि अक्षय लांजेकरने २१ धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. हेमंत बुचडेने १४ धावांत २ विकेट्स मिळवल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना साहिल गोडेने एक अर्धशतकी आणि एक शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. साहिलने सलामीचा जोडीदार आशय सरदेसाईच्या (२४) साथीने पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीस आलेला सिद्धांत गोलंदाजांवर हल्लाबोल करत असताना साहिलने दुसऱ्या बाजूने किल्ला लढवता ठेवला. गोलंदाजीत एक विकेट मिळवणाऱ्या सिद्धांतने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम गाळायला लावला. सिद्धांतने २० चेंडूतील नाबाद ६८ धावांच्या खेळीत चार चौकार आणि सात षटकार ठोकले.साहिलने सात चौकार आणि पाच षटकांरासह नाबाद ७५ धावा केल्या. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाने १०.२ षटकातच १६४ धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले. या डावातील एकमेव विकेट सागर जोशीने मिळवली.
प्रारंभी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलचे प्रमुख क्रिकेट प्रशिक्षक नरेश वाघमारे यांच्या हस्ते सिध्दांत सिंगला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १६३ (अक्षय लांजेकर २१, शशांक मेस्त्री ३७, करण नायडू ३६, हेमंत बुचडे ४-१४-२, सिध्दांत सिंग २-१२-१, अंजदीप लाड ३-३१-१, अमित पांडे ३-२८-१, अतुल सिंग ४-४३-१) पराभुत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : १०.२ षटकात १ बाद १६४ (साहिल गोडे नाबाद ७५, सिध्दांत सिंग नाबाद ६८, आशय सरदेसाई २४, सागर जोशी १-१५-१).

 16,821 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.