ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक

ओमकार रहाटे आणि स्वप्निल दळवी या सलामीच्या जोडीने हल्लाबोल करत राज क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांना पुरते हतबल करुन टाकले. या दोघांनी १०.४ षटकात पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला.

ठाणे : ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक आणि स्वप्नील दळवीची धुवांधार अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय इंदप क्रिकेट क्लबने राज क्रिकेट अकॅडमीचा सहा विकेट्सनी पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती टी २० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
सेंट्रल मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर विजय इंदप क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ओमकार रहाटे आणि स्वप्निल दळवी या सलामीच्या जोडीने हल्लाबोल करत राज क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांना पुरते हतबल करुन टाकले. या दोघांनी १०.४ षटकात पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. ओमकारने ७३ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद ११२ धावांची शतकी खेळी केली. तर स्वप्नीलने ३४ चेंडूत ८३ धावा करताना आठ चौकार आणि सात षटकार ठोकले. अकनंन अन्सारीने १४ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत नाबाद २६ धावांसह ओमकारसोबत नाबाद १०५ धावांची डावातील दुसरी शतकी भागीदारी करत संघासाठी २० षटकात १ बाद २३१ धावसंख्या उभारली. या डावातील एकमेव विकेट अजय चौहानने मिळवली.
उत्तरादाखल राज क्रिकेट अकॅडमीला २० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १०८ धावापर्यंत मजल मारता आली. मनोज भांडवलकरने ३९, अजय चौहानने २० धावा बनवल्या. विजय इंदप क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांना यष्टीपाठी १५ वर्षीय इशा मोकाशीने चांगली साथ दिली. मुलांच्या वरीष्ठ संघातून खेळताना इशाने प्रतिस्पर्ध्यांना अवांतर धावा घेऊ दिल्या नाहीत. स्वप्नील दळवीने दोन आणि देविदास शेडगे, अश्विन माळी, शित रंभिया आणि सचिन चव्हाणने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विजय इंदप क्रिकेट क्लब : २० षटकात १ बाद २३१(स्वप्नील दळवी ८३, ओमकार रहाटे नाबाद ११२, अकनंन अन्सारी नाबाद २६, अजय चौहान ४-५९-१) विजयी विरुद्ध राज क्रिकेट अकॅडमी : २० षटकात ७ बाद १०८ ( मनोज भांडवलकर ३९, अजय चौहान २०, स्वप्नील दळवी ३-११-२, देविदास शेडगे ३-१-८-१, अश्विन माळी ३-१६-१, शित रंभिया ४-२०-१, सचिन चव्हाण ४-२६-१).

 16,380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.