वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ‘ध चा मा’

विजयी उमेदवारांचे नाव मतदारयादीत नाही, प्रींटिंग मिस्टेकचे कारण देत अधिकार्‍यांकडून सारवासारव, वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलचा आरोप

ठाणे : वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विजयी महिला आणि पुरुष उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्याचा गोंधळ समोर आला आहे. प्रींटिंग मिस्टेकचे कारण देत या प्रकरणी अधिकार्‍यांकडून सारवासारव केली जात आहे, असा आरोप वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलने केला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘ध चा मा’ झाल्याने सहकार क्षेत्राच्या फसवणुकीप्रकरणी संबंधित संपूर्ण पॅनल बाद करावे; अशी मागणी वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलकडून करण्यात आली आहे.
वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ४ मार्च रोजी वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर हॉल येथे पार पडली. या निवडणुकीचा निकाल उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या सही प्रत आदेशाने जाहीर करण्यात आला. यावेळी निकालपत्रामध्ये विद्या विजय चौधरी आणि भरत बापूराव काळे या उमेदवारांना गटातून विजयी घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य मतदान पत्रिका आणि मतमोजणी पेपरवर चौधरी विद्या विजय आणि काळे भारत बा अशी नावे आहेत. या विजयी उमेदवारांकडे संस्थेचे कोणतेही शेअर्स नाहीत. त्यामुळे ही नावे मतदारयादीत नाहीत हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. तसेच छाननी अंती सर्व अर्जांच्या वैध यादीवर निवडणूक अधिकाऱ्यांची अधिकृत सही नाही. या सर्व निवडणूक प्रक्रियेत मतदार यादी आणि मतदानपत्रिका यातील नावांमध्ये फरक आहे. हा प्रकार ‘ध चा मा’ होऊन सुद्धा उमेदवारांसह यांचे संपूर्ण पॅनल बाद करण्याऐवजी त्यांना विजयी घोषित केले गेले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बगल दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने वर्तकनगर माजिवडे सहकार पॅनलने निवडणूक प्रक्रियेची आणि मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलने निवडणूक अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
निवडणूक प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वसाधारण गटातून वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलच्या ७१ मतपत्रिका अवैध ठरल्या. तर दुसरीकडे वर्तकनगर माजिवडे सहकार पॅनलच्या १०० मतपत्रिका वैध ठरवण्यात आल्या. यासोबतच या पॅनलच्या महिला गटात ११८ मतपत्रिका वैध ठरल्याने एकंदर ही निवडणूक प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोप स्थानिक समर्थ पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
लेखी खुलासा देण्याची केली मागणी
पॅनलच्या या गोेंधळाबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी लेखी खुलासा करावा, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी या उमेदवारांवर काय कारवाई करतात की फेरनिवडणूक घेतात. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 318 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.