सावरकर गौरव यात्रेने
ठाणे शहर दुमदुमले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच हजारो नागरिकांचा सहभाग

ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे करुन देण्याबरोबरच नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची ओळख करुन देण्यासाठी ठाणे शहरात भाजपा-शिवसेना युतीने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेने आज ठाणे शहर दुमदुमले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यात्रेत चार तासांहून अधिक काळ सहभागी होत स्वातंत्र्यवीरांच्या जयजयकारात सहभाग घेतला.
गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती स्तंभातील सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन गौरव यात्रेला सुरुवात झाली. राम मारुती रोड, गोखले रोड, हरी निवास, पाचपाखाडी, नितीन कंपनी, रामचंद्र नगर, संत ज्ञानेश्वर नगर, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, यशोधन नगर, वर्तक नगर, शास्त्रीनगर, वसंत विहार या भागातून यात्रा रवाना झाली. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी गौरव यात्रेचे स्वागत करीत स्वातंत्र्यवीरांचा जयजयकार केला. सावरकरांच्या अजरामर गीताने वातावरण भारून गेले होते. मी सावरकर… अशा टोप्या हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी परिधान केल्या होत्या. भगवे ध्वज व शेकडो बाईकवरील कार्यकर्त्यांच्या घोषणांमध्ये सुमारे चार तासांनंतर यात्रेचा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर समारोप करण्यात आला. सावरकरजी के सम्मान है, शिवसेना-भाजपा मैदान में, वीर सावरकर का बलिदान, नही भुलेगा हिंदुस्थान, वंदे मातरम् अशा घोषणांनी यात्रेचा परिसर दुमदूमून गेला होता.
या यात्रेत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, सचिव संदीप लेले, माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे, संजय वाघुले, नारायण पवार, संजय मोरे आदींसह शिवसेना-भाजपा युतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली. ठाण्यातील भव्य सावरकर गौरव यात्रेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, बलिदान विसरुन त्यांचा अपमान करणाऱ्यांविषयी चीड दिसून आली. सावरकरांविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीसारख्या प्रवृत्तीचा निषेध असून धिक्कार करीत आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एक दिवस सेल्यूलर जेल व त्यांनी सोसलेल्या यातना सहन करण्याची हिंमत दाखवावी, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वाच्या मान-सन्मानात वाढ झाली आहे. त्यामुळे सावरकरांचे विचार जाणीवपूर्वक रोखण्याबरोबरच त्यांचा अपमान केला जात आहे. हिंदुत्वाला बदनाम केले जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
हिंदू म्हणून नाव घ्यायला लोक घाबरत होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी `गर्व से कहो हिंदू है’ असा नारा दिला. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर, त्याला रस्त्यावर उतरुन शिवसेनाप्रमुखांनी जोडे हाणले होते. मात्र, त्यांचा वारसा सांगणारे काही लोक कॉंग्रेसच्या राहुल गांधी सावरकरांचा अपमान केल्यानंतरही, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, हे दुर्देव आहे. जनता सुज्ञ आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

 29,246 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.