स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवताना राजावडी क्रिकेट क्लबने महाराष्ट्र यंग क्रिक्रेटर संघाचा ७३ धावांनी दणदणीत पराभव केला.
मुंबई : वृषाली भगत, धनश्री वाघमारे, क्षमा पाटेकर आणि निव्या आंब्रेच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर राजावडी क्रिकेट क्लबने मुंबई क्रिकेट संघटनेच्या पहिल्या आंतर क्लब महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवताना राजावडी क्रिकेट क्लबने महाराष्ट्र यंग क्रिक्रेटर संघाचा ७३ धावांनी दणदणीत पराभव केला.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर राजावडी क्रिकेट क्लबने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १७२ धावांचे आव्हान उभे केले. संघाच्या धावसंख्येला आकार देताना वृषालीने ४१ चेंडूत ५९, धनश्रीने २६ चेंडूत नाबाद ४१, निव्या आंब्रेने २८चेंडूत २९, क्षमा पाटेकरने २२ चेंडूत २६ धावांचे योगदान दिले. क्षमा पाटेकर आणि निव्या आंब्रेने आपल्या भेदक गोलंदाजीने मोठया धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्र यंग क्रिक्रेटर संघाला २० षटकात ८ बाद ९९ धावांवर रोखत संघाचा विजय निश्चित केला. क्षमाने ११ धावांत ४ आणि निव्याने १७ धावांत २ विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : राजावडी क्रिकेट क्लब : २० षटकात ३ बाद १७२ ( वृषाली भगत ५९, धनश्री वाघमारे नाबाद ४१, निव्या आंब्रे २९, क्षमा पाटेकर २६) विजयी विरुद्ध महाराष्ट्र यंग क्रिक्रेटर : २० षटकात ८ बाद ९९ (क्षमा पाटेकर ३-११-४, निव्या आंब्रे ३-१७-२). राजावडी क्रिकेट क्लब ७३ धावांनी विजयी.
263 total views, 2 views today