मुंबईकर अनुभवणार स्पार्टन मुंबई श्रीचे पोझयुद्ध

अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात प्राथमिक फेरीसाठी शुक्रवारी द्वंद्व

मुंबई : ज्या मुंबई श्री ची वाट अवघे शरीरसौष्ठव जगत गेले तीन वर्ष पाहात होता, ती प्रतीक्षा आता संपली आहे. खरोखरच मुंबईकरांचा आणि मराठमोळ्या युवकांचा-युवतींचा उत्साह वाढवेल, अभिमानाने छाती फुगवेल असा क्षण दोन दिवस रंगणार्‍या स्पार्टन मुंबई श्रीच्या निमित्ताने अनुभवयाला मिळणार आहे. भारतीय शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई श्री स्पर्धेत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धा, महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिजीक स्पोर्टस्च्या दोन गटातील पोझयुद्धाची प्राथमिक चाचणी शुक्रवारी शहाजी राजे क्रीडा संकुलात रंगणार असून यात प्राथमिक पोझयुद्धासाठी ३०० पेक्षा अधिक खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरतील. स्पर्धेची वजन तपासणी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल तर सायंकाळी ४ वाजता प्राथमिक फेरीचा थरार रंगेल.
तब्बल दोन दशकांनंतर अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलाच्या प्रांगणात मुंबई श्रीचा दोन दिवसीय पीळदार सोहळा खेळाडूंच्या विक्रमी उपस्थितीने रंगणार आहे. तीन वर्षांनी होत असलेल्या या फिटनेस सोहळ्यात खेळाडूंना सन्मानजनक रोख पुरस्कार दिले जाणार आहे. खेळाडूंना श्रीमंत करणार्‍या या स्पर्धेत शरीरसौष्ठवालाही नवी झळाळी देण्याचा प्रयत्न शरीरसौष्ठव संघटना करत असल्याचे शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी सांगितले. आठ लाखांची रोख बक्षिसे आणि सर्वांना आपल््या प्रेमात पाडणारा भव्य दिव््य चषक ह स्पार्टन मुंबई श्रीचे आकर्षण असले तरी मिस मुंबई स्पर्धासुद्धा आकर्षक होणार असल््याचे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. शुक्रवारी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून शनिवारी अंतिम फेरीचा थरार रंगेल. त्यामुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची खरी ताकद पाहायची असेल तर मुंबईकरांनी शनिवारी या स्पर्धेला नक्की भेट द्यावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी केले.
स्पर्धेसाठी सारेच सरसावले
स्पार्टन न्यूट्रिशन्सने मुंबई श्रीला मुख्य पुरस्काराचे बळ दिलेय, पण शरीरसौष्ठवावर प्रेम करणारे अनेक क्रीडाप्रेमी आणि संघटकही मुंबई श्रीसाठी पुढे सरसावले आहेत. व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांनी विजेत्याला सवा लाखांचे इनाम देणार असल्याचे जाहीर केले आहे तर स्पर्धेतील इतर रोख पुरस्कार आणि चषकांसाठी अमोल कीर्तीकर, सिद्धेश कदम, अ‍ॅड. विक्रम रोठे आणि विजय झगडे या संघटकांनी आर्थिक हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमी सुबोध मेनन यांनीही नेहमीप्रमाणे शरीरसौष्ठवावर आपले प्रेम दाखवले आहे.
खेळाडूंचा विक्रमी सहभाग
गेली दोन वर्षे करोनामुळे स्पर्धाच होऊ शकली नव्हती. त्याची सर्व कसर यंदा भरून काढली जाणार असून प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होणार आहेत. मुंबई श्रीसाठी मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत दोनशेच्या आसपास मुंबईचे पीळदार वैभव मंचावर उतरेल. त्यापैकी ऐंशी खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. यंदा प्रत्येक गटातून दहा खेळाडू अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. जेतेपदासाठी प्रचंड चुरस असली तरी निलेश दगडे, रोहन गुरव, सुशांत तांबीटकर, उमेश गुप्ता, नितांत कोळी, सुशांत पवार, नितीन शिगवण आणि विशाल गिझेसारखे तयारीतले खेळाडूच मुंबई श्रीच्या शर्यतीत असतील. मिस मुंबईसाठी हर्षदा पवार, श्रद्धा ढोके, गौतमी सोनावणे या मर्‍हाठमोळ्या पीळदार सौंदर्यवती जमलेल््या हजारो प्रेक्षकांना आपल्या पीळदार सौंदर्याने मोहित करतील. त्याचप्रमाणे फिजीक स्पोर्टस् प्रकारातही महिलांसह पुरूषांचाही विक्रमी सहभाग असेल, अशी माहिती सुनील शेगडे यांनी दिली.

 122 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.