मैदान दत्तक घेऊन करमरकर
यांचं उचित स्मारक उभारावं!

शोकसभेत राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : ‘मुंबई शहरात एखादं मैदान दत्तक घेऊन त्या ठिकाणी ज्येष्ठ क्रीडा संपादक वि.वि.करमरकर यांचं उचित स्मारक उभारावं’, अशी आग्रही मागणी मैदान बचाव समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर सावंत यांनी राज्य सरकारकडे केली. दादर येथे राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या करमरकर यांच्या शोकसभेवेळी त्यांनी ही मागणी केली.
या शोकसभेत विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू आणि करमरकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होता. मैदाने वाचली तर खेळ वाचतील, खेळ जगले तर खेळाडू जगतील आणि खेळांचा नीट, नेमका प्रचार प्रसार झाला तर संघटना वाढतील, अशी भूमिका घेऊन आपले उभे आयुष्य खेळांसाठी वेचणाऱ्या करमरकर यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांच्या नावाने एखादे मैदान दत्तक घेऊन त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं करायला हवं. या मोकळ्या मैदानात युवा मुलेमुली मोकळा श्वास घेऊन खेळतील आणि पुढे प्रगती करतील. या ठिकाणी विविध मैदानी आणि बैठ्या खेळांचे प्रशिक्षण मिळेल, अशी व्यवस्था करून करमरकर यांचे पाच दशकांतील लेखन वाचण्यासाठी उपलब्ध करून देता येईल, याकडे सावंत यांनी सरकारचे लक्ष वेधले.
करमरकर यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमलो असलो तरी त्यांचं लिखाण, विचार, मार्गदर्शन नव्या पिढीकडे पोहचवण्याची नितांत गरज आहे. यासाठी पुस्तक रुपात ठोस निर्माण होण्याची गरज आहे. खेळ, खेळाडू आणि संघटना वाढण्यासाठी या आठवणींच्या कोलाजाचा मोठा उपयोग होऊ शकतो, अशी मांडणी करमरकर यांच्या भाची डॉ. साधना जोगळेकर यांनी केली. याचबरोबर करमरकर यांनी प्रतिपक्ष नावाचा ट्रस्ट स्थापन केला असून या माध्यमातून देश विदेशात खेळांचे वृत्तांकन करण्यासाठी युवा क्रीडा पत्रकारांना मदत केली जाणार आहे, अशीही माहिती जोगळेकर यांनी दिली.
मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी रवी मान्द्रेकर यांनी राज्य सरकारने करमरकर यांच्या नावाने राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार सुरू करावा, अशी सूचना केली. शोध पत्रकारिता करून खेळ, खेळाडू आणि संघटनांना आरसा दाखवणारा आणि त्याचा खेळांच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या राज्यभरातील एका निवडक पत्रकाराला हा पुरस्कार दिला जावा. यामुळे करमरकर यांनी हयातभर ज्या पारदर्शक कामांसाठी आग्रह धरला, ते पूर्णत्वास जाण्यास मदत होऊ शकेल, असे मान्द्रेकर यांनी सांगितले.
यावेळी माजी न्यायाधीश हेमंत गोखले आणि अभय ठिपसे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू सदा शेट्ये, राजू भावसार, कबड्डीसह मैदानी खेळांचे संघटक बाळ वडवलीकर, माजी बॅडमिंटनपटू तसेच संघटक प्रदीप गंधे, करमरकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे, प्रकाश अकोलकर, प्रताप आसबे, प्रतिमा जोशी, श्रीराम शिधये आणि शरद कद्रेकर यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय परब यांनी केले.

 238 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.