नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम,
पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू

आमदार निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सुचनेवर राज्य सरकारकडून उत्तर

ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशीला अनुसरून राज्यात पहिली व दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय धोरणामध्ये राज्याच्या स्तरावर १५ ते २० टक्के बदल केला जाईल. त्याचबरोबर बोलीभाषेच्या समावेशाबाबत विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आज दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि रमेशदादा पाटील यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर शिक्षण मंत्री केसरकर यांनी सविस्तर उत्तर दिले.
केंद्र सरकारचा शिक्षण विभाग, एनसीईआरटी यांच्या सुचनांनुसार बालशिक्षण, शालेय शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि शिक्षक शिक्षण या विषयावरील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत ४० तज्ज्ञांबरोबर चर्चा केली. त्यासंदर्भात तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी चार हजार ५०० अर्ज आले आहेत.
या अर्जांच्या पडताळणीनंतर एकास तीनप्रमाणे मुलाखती घेतल्या जातील. राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत स्थापन होणाऱ्या समितीत बालभारतीमधील अधिकारी यांचा समावेश असेल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
सध्या पूर्व प्राथमिक व दुसरीपर्यंतच्या राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार झाल्यावर, त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. त्यानंतर पाठ्यपुस्तके व शिक्षण हस्तपुस्तिका तयार करण्यात येईल. तसेच यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक प्रशिक्षण घेतले जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

 6,955 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.