बेलापूर ब्लास्टर्सचा आणखी एक विजय

शंतनू नायक, अक्ष पारकरची नाबाद खेळी, प्रभाकर निषाद आणि श्रेयस गुरवने बाद केले प्रत्येकी दोन फलंदाज.

ठाणे : बेलापूर ब्लास्टर्सने अंबरनाथ एव्हेंजर्सचा पाच विकेट्सनी पराभव करत माझगाव क्रिकेट क्लब आयोजित नवीमुंबई प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपल्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद केली. नाबाद ३४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या शंतनू नायकला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार या लीग आणि फेअर प्ले स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक अभिजित घोष यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
अंबरनाथ एव्हेंजर्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा फलदायी ठरला नाही. कागदावर प्रबळ वाटणारी अंबरनाथ एव्हेंजर्सची फलंदाजी मैदानावर मात्र छाप पाडू शकली नाही. भरवशाचा जय बिष्ट अवघ्या १३ धावांवर बाद झाला. एकीकडे इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरत असताना पराग जाधवने नाबाद ३९ आणि अश्विन शेईकेच्या २२ धावांमुळे अंबरनाथ एव्हेंजर्सला २० षटकात ८ बाद ११२ धावापर्यंत मजल मारता आली. प्रभाकर निषाद आणि श्रेयस गुरवने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. विद्याधर कामतने एक विकेट मिळवली.
या आव्हानाचा पाठलाग करताना बेलापूर ब्लास्टर्सचे फलंदाजही अडखळत होते. पण शंतनू नायकने नाबाद ३४, अक्ष पारकरने नाबाद २५ आणि अनिकेत खाडेच्या ३२ धावांमुळे बेलापूर ब्लास्टर्सचा विजय साकारला. प्रसाद शिंगोटेने दोन, चैतन्य भोईर, ओम केशकामत आणि संकेत गोवारीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ एव्हेंजर्स : २० षटकात ८ बाद ११२ ( जय बिष्ट १३, पराग जाधव नाबाद ३९, अश्विन शेईके २२, प्रभाकर निषाद ४-१-१४-२, श्रेयस गुरव ४-१९-२, विद्याधर कामत ४-२३-१) पराभुत विरुद्ध बेलापूर ब्लास्टर्स : १९ षटकात ५ बाद ११५ (शंतनू नायक नाबाद ३४, अनिकेत खाडे ३२, अक्ष पारकर नाबाद २५, प्रसाद शिंगोटे ३-१०-२, चैतन्य भोईर २-२८-१, ओम केशकामत ३-१६-१, संकेत गोवारी ४-१८-१).

 58,635 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.