वाशी वॉरीयर्सचा विजय

धृमिल मटकरने अष्टपैलू कामगिरी करताना एका विकेटसह नाबाद २७ धावांची केली खेळी.

ठाणे : वाशी वॉरियर्स संघाने अंबरनाथ एव्हेंजर्स संघाचा पाच विकेट्सनी पराभव करत माझगाव क्रिकेट क्लब आयोजित नवी मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपल्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद केली. अंबरनाथ एव्हेंजर्सच्या १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वाशी वॉरीयर्स संघाने १८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ५ बाद १४३ धावांसह विजय साकारला. एक विकेट आणि नाबाद २७ धावा करणाऱ्या धृमिल मटकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
जय बिष्टच्या ७८ धावांच्या खेळीमुळे अंबरनाथ एव्हेंजर्सने समाधानकारक धावसंख्या उभारली. विश्वजित जगदाळेने २३ धावा केल्या. अतुल सिंगने १८ धावांत ३ तर धृमिल मटकर आणि ऋषिकेश पवारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
उत्तरादाखल प्रणव धनावडेने ४२ धावांची खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला. धृमिल मटकरने नाबाद २७ , जितेश राऊतने २६ आणि निखिल पाटीलने नाबाद १९ धावा केल्या. संकेत गोवारीने दोन, जय बिष्ट,अश्विन शेळके, प्रसाद शिंगोटेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

 28,632 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.