इराणला नमवत भारत अजिंक्य


ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा
उरमिया, (इराण) : पिछाडीनंतरही भारताच्या ज्युनियर्सनी भन्नाट- सुसाट खेळ करत यजमान इराणचा ४१-३३ असा पराभव करत दुसर्‍या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत इराणमध्ये तिरंगा डौलाने फडकावला. पहिली स्पर्धासुद्धा इराणमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यात इराणच विजेता ठरला होता.
काल भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता तर इराणने नेपाळचा सहज पराभव पहिल्या सत्रात इराणचे खेळाडू जोरदार खेळ करत होते, तसेच पंचांशी वारंवार हुज्जतही घालत होते. वादग्रस्त आणि संघर्षपूर्ण खेळाच्या पहिल्या सत्रात इराण भारतापेक्षा काकणभर सरस ठरला. एवढेच नव्हे तर पहिल्या दहा मिनीटांतच भारतावर लोण चढवण्याचाही करिश्मा इराणने दाखवल्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा इराण १९-१८ असा आघाडीवर होता.
मध्यंतरानंतर भारताने वेगळी रणनीति आजमावत इराणच्या बचावफळीवर हल्ला चढवला. नरेंदर कंडोला, मनजीत शर्मा आणि जय भगवानने आपल्या आक्रमक चढाईच्या जोरावर इराणवर लोण चढवत आघाडी घेतली. भारताने मध्यंतरानंतर घेतलेली आघाडी झुंजार खेळ करीत शेवटपर्यंत नुसती राखली नाही तर वाढवलीसुद्धा. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना भारत ३३-३० असा आघाडीवर होता. पण या पाच मिनिटांत त्यांनी भन्नाट चढाया आणि मगरमिठी (सुपर टॅकल) मारत सामन्यावर अशी पकड घेतली की ती इराणला सोडवताच आली नाही.भारताने वेगवान चढाया करत शेवटच्या मिनिटाला ४१-३३ अशा गुणांसह इराणवर मात केली आणि कबड्डीच्या जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले.

छाया – जितेश शिरवडकर

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.