परळ श्री मध्ये रसलची दिसली “मसल पावर”

महिलांमध्ये हर्षदा पवार तर मेन्स फिजिक मध्ये ओमकार पिंगे विजेता

मुंबई : दृष्ट लागावी असं दिमाखदार आयोजन, अभिमानाने छाती फुगावी अशी बक्षीसांची उधळण, जेतेपदासाठी संघर्ष करणारे एकापेक्षा एक असे पीळदार योद्धे अशा स्फूर्तीदायक उत्साहवर्धक वातावरणात रंगलेल्या किंग मास क्लासिक आयोजित “परळ श्री २०२३” मध्ये रोहन गुरव आणि सुदर्शन खेडेकरला मागे टाकत बॉडी वर्कशॉपच्या रसल दिब्रिटोने बाजी मारली. तसेच प्रथमच आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आर के फिटनेसची हर्षदा पवार विजेती ठरली तर मेन्स फिजिक प्रकारात दांडेश्वर जिमचा ओमकार पिंगे अव्वल ठरला.
ज्या खेळाने आपल्याला मोठं केलं, नाव दिलं, प्रेम दिलं. त्या खेळाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असंख्य शरीरसौष्ठवपटूंचा मार्गदर्शक, गॉडफादर आणि सच्चा दोस्त असलेल्या मनीष आडविलकरने पुन्हा एकदा परळ श्री स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन करून आपले अनोखे प्रेम व्यक्त केले. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल असे अभूतपूर्व आयोजन “परळ श्री” स्पर्धेच्या माध्यमातून परळच्या नरे पार्क मैदानात केले गेले. किंग कपिल झव्हेरी, स्टार कनेक्टचे दीपक चौहान आणि मनीष अरोरा तसेच DAPP आणि स्क्रीम पावर ड्रिंक यांच्या सहकार्यामुळेच हा अभूतपूर्व सोहळा संस्मरणीय झाला. क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी यांच्या वतीने रॉयल एनफिल्ड आणि सुझुकी बर्गमन या दुचाकी विजेत्यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
काल झालेल्या परळ श्रीच्या प्राथमिक फेरीतून अव्वल ३६ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक गटात निवडलेल्या सहा खेळाडूंपैकी अव्वल खेळाडूची निवड करताना जजेसना आपले कौशल्य पणाला लावावे लागले. विशेष म्हणजे प्रत्येक गट चुरशीचा झाला.
६० किलो वजनीगटात फॉर्च्यून फिटनेसच्या नितीन शिगवण ने प्रशांत घोलम आणि राज थापावर मात करीत गटविजेतेपद पटकावले. तसेच ६५ किलो वजनी गटात व्ही.जी. फिटनेसच्या उमेश गुप्तालाही अव्वल स्थान पटकावताना आनंद पांडे आणि गणेश पारकरचे कडवे आव्हान मोडीत करावे लागले. ७० किलो वजनीगटात परब फिटनेसचा प्रतीक पांचाळ आणि संदीप सावळे यांच्या “कांटे की टक्कर” झाली. ज्यात प्रतीक पहिला आला. मात्र ७५ किलो वजनी गटात फ्लाईंग स्क्वाडच्या रोहन गुरवला अव्वल स्थान पटकावताना फार संघर्ष करावा लागलं नाही. ८० किलो वजनीगटात की फिटनेसच्या सुदर्शन खेडेकरसमोर सतीश यादव आणि आशिष लोखंडे यांनी जोरदार लढत दिली. मात्र सुदर्शनच्या चक्रापुढे त्यांचे काहीएक चालले नाही. सर्वात मोठ्या गटात बॉडी वर्कशॉपचा रसल दिब्रिटो हा गणेश जाधव आणि दीपक तांबिटकरपेक्षा सरस ठरला.
महिलांच्या शरीरसौष्ठवालाही जोरदार प्रतिसाद
प्रथमच आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेलाही अप्रतिम प्रतिसाद लाभला या स्पर्धेला महाराष्ट्रातील स्पर्धकांनी आपल्या सहभाग नोंदविला होता. आर के फिटनेसच्या हर्षदा पवारला आपले पहिले जेतेपद पटकावताना दीपा सप्रे, श्रद्धा डोके, किमया बेर्डे आणि मनीषा हळदणकरचे कडवे आव्हान मोडीत काढावे लागले. विजेतीला लाख मोलाची सुझुकी बर्गमन ही दुचाकी देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंगे ठरला आयफोनचा मानकरी
मेन्स फिजिक प्रकारात सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग लाभला. तब्बल ४५ खेळाडूंच्या सहभागामुळे परळ श्रीच्या झालेल्या या स्पर्धेत १६५ सेमी उंचीच्या गटात फिटनेस फिजिक्सचा ऋषिकेश पेणकर पहिला आला. १६५ सेंमीवरील गटात दांडेश्वर जिमच्या ओमकार पिंगेने बाजी मारली. मग या दोघांमध्ये झालेल्या जेतेपदाच्या लढतीत पिंगे सरस ठरला आणि त्याला सिने अभिनेता साहिल खानच्या वतीने आयफोन १४ प्रो पुरस्कार रूपाने देण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आयोजक मनीष आडविलकर, किंग कपिल झवेरी, क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी, स्टार कनेक्टचे दीपक चौहान, मनीष अरोरा, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, प्रभाकर पवार, विजय झगडे आणि स्क्रिम पावर ड्रिंक्सच्या मोना भावसार यांच्या उपस्थितीत पार पडला.
किंग मास क्लासिक प्रस्तुत “परळ श्री २०२३” स्पर्धेचा निकाल
६० किलो वजनीगट : १.नितीन शिगवण (फॉर्च्यून फिटनेस), २. प्रशांत घोलम (स्ट्रेंथ जिम), ३. राज थापा ((माँसाहेब), ४. कल्पेश सौंदळकर (सर्वेश्वर फिटनेस), ५. अजिंक्य पवार (महाराष्ट्र फिटनेस),
६५ किलो: १. उमेश गुप्ता (व्ही.जी.फिटनेस), २. आनंद पांडे (सालम जिम), ३. गणेश पारकर (परब फिटनेस), ४.अरुण पाटील (सालम जिम), ५.बप्पन दास (डी एन फिटनेस),
७० किलो : १. प्रतीक पांचाळ (परब फिटनेस), २. संदीप सावळे (डी. एन. फिटनेस)), ३. रोशन नाईक (आर एन फिटनेस), ४. विशाल धावडे (बालमित्र), ५. विनायक लोखंडे ( मसल इंजिनियर).
७५ किलो : १. रोहन गुरव (फ्लाईंग स्कॉड), २. मकरंद दहिबावकर ( जे नाईन फिटनेस), ३. गणेश म्हापदी (जे नाईन फिटनेस), ४. आनंदराज चिल्ले दुराई (सालम जिम), ५.आसिफ शेख (मॉर्डन फिटनेस).
८० किलो : १. सुदर्शन खेडेकर (की फिटनेस), २. सतीश यादव (तळवळकर्स) , ३. आशिष लोखंडे (परब फिटनेस), ४. गणेश पेडामकर (सर्वेश्वर फिटनेस), ५. अक्षय खोत ( परब फिटनेस).
८० किलोवरील : १. रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), २. गणेश जाधव (व्ही फिटनेस), ३. दीपक तांबीटकर (फॉर्च्यून जिम), ४. अनिकेत पाटील मसल क्राफ्ट, ५. अनिकेत जाधव (डी एन फिटनेस)
परळ श्री २०२३ विजेता : रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), उपविजेता : सुदर्शन खेडेकर (की फिटनेस), द्वितीय उपविजेता : रोहन गुरव (फ्लाईंग स्कॉड).
मेन्स फिजिक (१६५ सेमी) : १. ऋषिकेश पेणकर (फिटनेस फिनिक्स), २. अनिकेत चव्हाण (रिगस जिम), ३. डेंझिल डिसुझा (डेन फिटनेस), ४. रईस रवानह (मॉर्डन फिटनेस), ५. अश्विन तुपे (अंबिका जिम).

मेन्स फिजिक (१६५ सेमीवरील) : १. ओमकार पिंगे (दांडेश्वर जिम), २. मितेश ठाकर (मांसाहेब जिम), ३. जाफर अन्सारी (रीप स्टील फिटनेस), ४. प्रथमेश बागायातकर (परब फिटनेस), ५. अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप). परळ श्री (मेन्स फिजिक) : ओमकार पिंगे (दांडेश्वर जिम)
महिला शरीरसौष्ठव : १. हर्षदा पवार (आर के फिटनेस), २. दीपा सप्रे (प्रो फिटनेस), ३. श्रद्धा डोके (आर के फिटनेस), ४. किमया बेर्डे (प्लस फिटनेस), ५. मनीषा हळदणकर (स्पार्टन जिम).

 153 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.