निलम – घुफ्रान अंतिम विजेते

शिव शंकर उत्सव मंडळ राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा

मुंबई : शिव शंकर उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ व इंडियन ऑइल सह पुरस्कृत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रानने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या पंकज पवारला २५-७, २५-० असे सहज हरवून विजेतेपद मिळवून रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक पटकाविले. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मात्र विश्व् क्रमांक ३ असलेल्या मुंबईच्या निलम घोडकेला विजयासाठी झगडावे लागले. तीन सेट पर्यंत रंगलेल्या लढतीत निलमने पालघरच्या श्रुती सोनवणेला पहिला सेट १५-२० असा गमावल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २४-८ व २५-११ असा जिंकून रोख रुपये ८ हजारांचे बक्षीस व चषक मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत माजी विश्व् विजेत्या पुण्याच्या योगेश परदेशीने नवोदित मुंबई उपनगरच्या जावेद शेखला २५-४, ८-२५ व २५-० असे हरविले. तर महिलांमध्ये झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या अनुभवी मिताली पाठकने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २५-८, २५-१९ अशी मात केली.
स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कर्त्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकारी स्नेहलता भोसले, सहकार ग्रुपचे सुरज सावंत तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष अरुण केदार, सचिव यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष केतन चिखले आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आयोजक शिव शंकर उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्यवाह जितेंद्र चव्हाण, सचिव प्रविण चौधरी, स्पर्धा प्रमुख कृष्णकांत परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 155 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.