कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे घातपाताचा संशय

गोहत्या बंदी कायद्याला विरोध करणार्‍या कम्युनिस्टांना आलेला अचानक गो-प्रेमाचा उमाळा संशयास्पद असल्याचे व्यक्त केले मत

ठाणे : कोल्हापूर येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ २० फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे. भारतीय प्राचीन संस्कृती जोपासणार्‍या कणेरी मठाच्या वतीने गेली अनेक वर्षे हजारो गायींचा सांभाळ केला जात आहे. भाकड आणि भटक्या गायींनाही सांभाळणारी आदर्श गोशाळा येथे आहे. असे असतांना तेथे गायींचा झालेला आकस्मिक मृत्यू हे एक षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेतर कणेरी मठ आणि काडसिद्धेश्वर स्वामी यांचे पर्यावरण प्रेम निर्विवाद आहे अन् ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. जे साम्यवादी आणि समाजवादी गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध करतात आणि शेतकर्‍यांच्या भाकड गायी कत्तलखान्यात जाव्यात यासाठी उघड भूमिका घेतात. तेच साम्यवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने अनेक गायी विकल्या, तसेच अनेक गायींच्या पोटात चोळीचे खण आणि प्लास्टिक पिशव्या सापडल्या, त्या वेळी कुठल्या बिळात लपून होते ? आज मात्र या साम्यवादी आणि समाजवाद्यांना अचानक गोप्रेमाचा उमाळा का आला ? यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका ही दुटप्पीपणाची आहे, हेच यातून दिसून येते. खरेतर मठामध्ये चालू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाचे यश समाजविघातकांना खुपले आहे. त्यामुळेच या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

 24,197 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.