परळ श्रीमध्ये पुरस्कारांची तुफान आतषबाजी

२५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घमासान, स्पर्धेत पोझ देणार्‍या प्रत्येक खेळाडूला लाभणार पुरस्कार.

मुंबई : सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्‍या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घालणार आहेत. स्पर्धेला खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यामुळे जेतेपदासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
बक्षीसेच बक्षीसे चोहीकडे
बक्षीसांचा धोधो पाऊस आजवर कधीच पडला नव्हता. मुंबई श्री असो किंवा महाराष्ट्र श्रीचा विजेता त्यांनाही लाख-दीड लाखांचे पुरस्कार दिले जातात, पण किंग मास क्लासिकची परळ श्री या सर्वांपेक्षा हटके आहे. शरीरसौष्ठवाचे चाहते दिनेश पुजारी पुन्हा एकदा विजेत्याला दोन लाख किमतीच्या रॉयल एनफिल्डवर स्वार करणार आहेत. किंग कपिल झवेरी आणि स्टार कनेक्टचे दीपक चौहान यांनी स्पर्धेच्या न भुतो न भविष्यति आयोजनासह खेळाडूंवर रोख पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. एकंदर सहा गटात होणार्‍या या स्पर्धेत प्रत्येक गटात ३० हजार रुपयांची रोख बक्षीसे दिली जाणार आहेत. एवढेच नव्हे तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या खेळाडूलाही लाखमोलाचे इनाम दिले जाणार आहे. मेन्स फिजीकमध्येही दोन गट असून या स्पर्धेचा विजेता आयफोन १४ ची भेट पुरस्कार रुपाने दिली जाणार असल्याची माहिती मनीष आडविलकरने दिली. शरीरसौष्ठवावर आणि परळ श्रीवर प्रेम करणार्‍या हितचिंतकांनी इतके प्रेम दाखविले आहे की स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला आम्ही पुरस्कार देणार आहोत, पण गटात अव्वल येणार्‍या पाच खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरशा वर्षाव होणार आहे. परळ श्रीच्या विेजेत्याला पुरस्कार घेऊन जाण्यासाठी टेम्पो आणावे लागेल, असेही तो म्हणाला.
परळ श्रीसाठी दिग्गजांची पोझिंग

परळ श्रीचे लाखमोलाचे पुरस्कार पाहून मुंबईतील शेकडो स्पर्धक उद्या शनिवारी नरे पार्कमध्ये प्राथमिक फेरीसाठी उतरतील. शनिवारी होणार्‍या प्राथमिक फेरीतून अव्वल पाच खेळाडू निवडले जाणार असून त्यांच्यात रविवारी परळ श्रीसाठी झुंज रंगेल. या पुरस्कारासाठी रसल दिब्रीटो, निलेश दगडे, रोहन गुरव, उमेश गुप्ता, गणेश जाधवसारखे तयारीतले हीरे मंचावर आपल्या पीळदार यष्टीने उपस्थितांचे डोळे दिपवणार आहेत. यंदापासून या स्पर्धेत परळ श्री विजेते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण जिंकणार्‍या खेळाडूंना उतरता येणार नाही.
महिलांमध्येही चुरस
प्रथमच परळ श्री स्पर्धेत महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील किमान २० खेळाडू येतील, असा विश्वास आयोजकांना आहे. या स्पर्धेतील विजेतीसुद्धा लाखमोलाची स्कूटर जिंकणार आहे. सोबत रोख पुरस्कार आहेतच.
संग्राम चौगुलेही परळ श्रीच्या प्रेमात
जागतिक कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुलेनेही परळ श्री विजेत्याला वर्षभराचा खुराक देणार आहे. हा खुराक म्हणजे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे किमान पाच लाखांचे सप्लिमेंटस् दिले जाणार आहेत. तसेच सांताक्रुझच्या डीसस जिमने विजेत्याला वर्षभराचे सदस्यत्व पुरस्कार म्हणून जाहीर केले आहेत.
परळ श्रीवर पुरस्कर्त्यांचे प्रेम
एवढेच नव्हे तर अनेक न्यूट्रिशन्स कंपन्या परळ श्रीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. डॅप कंपनीने परळ श्रीचे मुख्य प्रायोजकत्व मिळविले असून स्क्रीम पॉवर ड्रींक आणि क्यूएनटी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचेही सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे नरेपार्कमध्ये दोन दिवस अनेक न्यूट्रिशन्स कंपन्या आपले स्टॉल मांडून शरीरसौष्ठवप्रेमींवर गिफ्टचा वर्षाव करणार आहेत.

 150 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.