क्लस्टर अंमलबजावणीबाबत
कोपरीतील नागरिकांमध्ये संभ्रम

कृष्णा भुजबळ यांच्याकडून आयुक्तांकडे गाऱ्हाणे, बिल्डर नियुक्ती केली नसल्याचे स्पष्टीकरण

ठाणे : कोपरी येथे क्लस्टर प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्लम सेलचे प्रमुख कृष्णा भुजबळ यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन संभ्रम दूर करण्याची विनंती केली. त्यावेळी सर्व नागरिकांच्या सहमतीनेच प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पासाठी अद्यापि कोणत्याही बिल्डरची नियुक्ती केलेली नाही. सध्या केवळ बायोमेट्रिक व नंबरींगचे काम सुरू आहे. कोणीही करारनामे करू नयेत, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाच्या स्लम सेलचे प्रमुख कृष्णा भुजबळ यांनी आज आयुक्त बांगर यांची भेट घेऊन क्लस्टरबाबत कोपरीवासियांची व्यथा मांडली. या वेळी शेखर निकम, सचिन कुटे, परशुराम नेहे, तानाजी पवळे, संजय यादव आदींची उपस्थिती होती. कोपरीतील क्लस्टर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. या प्रकल्पाबद्दल हजारो कोपरीवासिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांचे आभारी आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, या प्रकल्पातील काही मुद्द्यांविषयी अजूनही नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
क्लस्टर सेलने मालमत्ताधारक, भोगवटादारांचे वास्तव्य व वास्तूंचे सर्वेक्षण करून भोगवटादारांची प्रारुप यादी भाग-१ तयार केली आहे. मात्र, सध्या कोपरी परिसरात बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. अनेक कुटुंबांमध्ये माहिती घेण्यासाठी कर्मचारी जात आहेत. अशा परिस्थितीत सर्वेक्षण पूर्ण झाले नसतानाच प्रारुप यादी भाग- १ ची प्रसिद्धी का केली, बायोमेट्रिकचे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून रहिवाशांना एका विकसकाच्या कार्यालयात करारनामा करण्यात सांगण्यात येत आहे, या कंपनीबरोबर महापालिकेने करार केला आहे का, क्लस्टर प्रकल्पासंदर्भात नागरिकांनी कोणाबरोबर करारनामा करावा. या मुद्द्यांबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम होता, असे भुजबळ यांनी सांगितले.
कोपरीत जुन्या अधिकृत इमारतींची संख्या मोठी आहे. तर केवळ दोन झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. जुन्या अधिकृत इमारतींना क्लस्टरमध्ये सहभागासाठी सक्ती केली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत कोपरीतील जुन्या अधिकृत इमारतींनी स्वतंत्रपणे पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यास क्लस्टर साकारू शकेल का, प्रकल्पात सहभागी होण्यास जुन्या अधिकृत इमारतींमधील सदस्यांच्या सर्वसाधारण सभेने संमती दिली आहे का, विस्थापित रहिवाशांचे पुनर्वसन कुठे करणार, घरभाड्याची हमी पालिका घेणार का, पारशीवाडी नाका येथे अंतिम टप्प्यात बांधकाम असलेल्या नव्या बहुमजली इमारतीचा क्लस्टरमध्ये समावेश होणार का, कोपरीत क्लस्टरसाठी विकसकाला महारेराच्या अटी लागू होणार का, भूखंडांवरील आरक्षणांबाबत कोणता निर्णय घेतला जाणार, किती मजल्यांच्या इमारती उभारणार, बहुमजली इमारतीतील देखभाल शुल्काबाबतचा भार महापालिका की विकसक आदी मुद्दे कोपरीवासियांकडून मांडले जात होते. या पार्श्वभूमीवर कृष्णा भुजबळ यांनी आज आयुक्तांची भेट घेतली होती.

 12,014 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.