लक्ष्मीमाता, प्रतिज्ञा, साईकृपा दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स उपांत्यपूर्व फेरीत

 मुंबई शहर कबड्डी संघटना आयोजित पुरुष द्वितीय व तृतीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२२-२३.

  मुंबई :  लक्ष्मीमाता कबड्डी संघ, प्रतिज्ञा मंडळ, साईकृपा मित्र मंडळ, दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्मीमाता कबड्डी संघाने जय दत्तगुरु कबड्डी संघाचा प्रतिकार ३६-२१ असा मोडून काढला. सौरभ तुणतुणे, निखिल सावंत यांनी आक्रमक सुरुवात करीत मध्यांतराला २६-०७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. जय दत्तगुरुकडून राजेंद्र लाड, वैभव नूरकर यांनी मध्यांतरानंतर थोडाफार प्रतिकार केला. प्रतिज्ञा मंडळाने तुषांत डोळस, अंकित जोशी यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर जय ब्राह्मणदेव मंडळाला ३०-१७ असे नमवित आगेकूच केली. जय ब्राह्मणदेवकडून प्रसाद बोमदे, अर्जुन हिंगुले यांचा प्रतिकार या सामन्यात दुबळा ठरला.
साईकृपा मित्र मंडळाने हिंदकेसरी मंडळावर ४०-२९ अशी मात केली. पहिल्या डावात १७-१४ अशी महत्वपूर्ण आघाडी साईकृपा संघाकडे होती. ऋषिकेश दोरुगडे, विनय खेडेकर यांच्या उत्कृष्ट चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. हिंदकेसरीचे साहिल तळेकर, सुजित जाधव चमकले. दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सने समर्थ स्पोर्ट्सचा ४३-२२असा सहज पाडाव केला. पहिल्या डावात सावध खेळ करीत १७-१५ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या दादोजी कोंडदेवने दुसऱ्या डावात आपला खेळ गतिमान करीत २१ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. प्रशांत पाटील, अनिकेत जाधव यांच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते. समर्थच्या मनोज गोरे, चंद्रकांत झोरे यांनी पहिल्या डावात कडवी लढत दिली. दुसऱ्या डावात ते पार ढेपाळले.

 135 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.