नेरुळ येथील हवेचा दर्जा सतत खालावतोय

नवी मुंबईकरांचे “हृदय वायू” प्रदूषणामुळे धोक्यात

नवी मुंबई- ठाणे : जानेवारी महिन्यात मुंबई नव्हे तर नवी मुंबईतील नेरुळ येथे हवेचा दर्जा सर्वात जास्त प्रदूषित आढळला असून नवी मुंबईकरांची चिंता नक्कीच वाढविणारी आहे. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान, नवी मुंबईतील नेरुळ येथील हवेचा दर्जा सलग ३०० प्रतिक्यूबीक मीटरपेक्षाही जास्त राहिला. नेरुळनजीकच्या उलवे ते पनवेल या पट्ट्यात  नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम तसेच एअरपोर्ट येत असल्यामुळे येथिल १५ ते २० किलोमीटर क्षेत्रात  चौफेर भागात इमारतीच्या बांधकामात २०० ते ३०० पटीने वाढ झालेली आहे. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. जेव्हा हवेतील प्रदूषक आपल्या शरीरात पोहोचतात तेव्हा हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. आधीच हृदय विकाराने त्रस्त असलेल्या लोकांनी प्रदूषणात वाढ होत असताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका असतो. वाहनांची वाढती संख्या, शहराच्या आजूबाजूला वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषणाने कळस गाठला आहे.वायू प्रदूषण आणि हृदयविकाराचा परस्परसंबंध स्पष्ट करताना नेरुळ येथील शुश्रुषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयरोग तज्ज्ञ  डॉ. संजय तारळेकर,म्हणाले, ” वायू प्रदूषण हे  विडी अथवा सिगारेट स्मोकिंगसारखे आहे, ज्याचा आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. प्रदूषणामुळे हृदयाच्या धमन्यांचे नुकसान होते, त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या आरोग्यासाठी वायू प्रदूषण अत्यंत घातक आहे. ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा आपण खराब गुणवत्तेच्या हवामानात अथवा हवेमध्ये, श्वासोच्छ्वास करतो, तेव्हा हवेत असणारी प्रदूषक तत्वं आपली फुप्फुसे आणि हृदयापर्यंत रक्तप्रवाहात खोलपर्यंत जाऊ शकतात. ज्यामुळे आपल्याला हृदया संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.वायू प्रदूषणा मध्ये वायू पेक्षा कणीय प्रदूषण अधिक घातक मानले जाते. यात अतिशय सूक्ष्म असलेले पीएम २.५ (पर्टीक्युलेट मॅटर) हे प्रदूषित कण सर्वांत धोकादायक असतात. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने पीएम २.५ हे कण ५० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असलेली हवा श्वसनास योग्य असते. पीएमचे प्रमाण आणि नायट्रोजनची मर्यादा शहराने ओलांडली असून, थंडीत या प्रदूषण वाढीस पोषक वातावरण मिळत आहे.”
वायू प्रदूषणा पासून होणारे नुकसान टाळायचे असेल किंवा त्यापासून बचाव करायचा असेल तर संतुलित आहार घेणे हा उत्तम उपाय ठरतो. संतुलित तसेच चौरस आहारामध्ये आवश्यक ती व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वे ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ते आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याशिवाय तुम्ही जीवनशैलीत नियमित व्यायामाचाही समावेश केला पाहिजे अशी माहिती हृदयरोगतज्ज्ञ   डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.
ठिकाण – हवेचा दर्जा
कोपरी गाव वाशी – २६ जानेवारीला हवेचा दर्जा ३१० तर २८ जानेवारीला ३०८ प्रति क्युबीकमीटरमध्ये नोंदवाल गेला.
सानपाडा – २६ जानेवारी आणि २७ जानेवारी या दोन्ही दिवस हवेचा दर्जा अनुक्रमे ३१५ आणि ३०८ प्रति क्युबीकमीटरमध्ये नोंदवला गेला.
नेरुळ – २७ ते १ फेब्रुवारीपर्यंत हवेचा दर्जा अनुक्रमे ३३१, ३४२, ३४३, ३६२, ३३१ आणि ३०० प्रति क्युबीकमीटरमध्येे नोंदवला गेला.

 8,904 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.