एकतर्फी विजयासह बीपीसीएल,आयएसपीएल, मध्य रेल्वे उपांत्य फेरीत

युनियन बँकेची पिछाडीनंतरही मिडलाईनवर मात,
स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ देसाई स्मृतीचषक विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा

मुंबई : युनियन बँक विरुद्ध मिडलाइन फाऊंडेशन यांच्यातला सामना वगळता एकही उपांत्यपूर्व लढत रंगली नाही. त्यामुळे स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे आणि आयएसपीएल (युवा पलटन) संघांनी एकतर्फी विजयासह सहजगत्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारत पेट्रोलियम विरुद्ध आयपीसीएल आणि मध्य रेल्वेविरुद्ध युनियन बँक अशा लढती रंगतील.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत आज दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीचा थरार मुंबईच्या थंडीप्रमाणे गायब झालेला दिसला. साखळीतून बाद फेरीत आलेल्या संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि जोरदार लढती पाहायला मिळतील, अशा माफक अपेक्षेने हजारोंच्या संख्येने गर्दी केलेल्या कबड्डीप्रेमींची घोर निराशा झाली. सध्या सुपर फॉर्मात असलेल्या आयएसपीएलने बँकेवर दरोडा टाकावा, तसे गुण बँक ऑफ बडोद्याविरुद्ध लुटले. अस्लम इनामदारच्या तुफानी चढायांचे बँकेकडे कसलेच उत्तर नव्हते. त्याने ११ चढायांत ८ गुण मिळविले. आकाश शिंदेनही ११ चढायांत ३ बोनस गुणांसह १० गुणांची कमाई केली. मोहित गोयतनेही ७ गुण मिळवित आपलेही योगदान दिले. या तिघांच्या वेगवान खेळामुळे आयएसपीएलने मध्यंतरालाच ३१-९ अशी निर्विवाद आघाडी घेतली होती. दुसर्‍या सत्रात ४९-१९ या गुणांवर आ़यएसपीएलने उपांत्य फेरी गाठली.
भारत पेट्रोलियमनेही आकाश रुडाले (६ गुण), नितीन गोगले (६) आणि रिशांक देवाडिगा (५) यांच्या चढायांच्या बळावर मुंबई महानगर पालिकेचा ३५-१५ असा धुव्वा उडवला. गिरीश इरनाक आणि विशाल माने यांनी अप्रतिम पकडी करत मध्यंतरालाच २४-११ अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यावर पकड घेतली. पालिकेच्या जावेद खानने काही चांगल्या चढाया केल्या, पण त्याचा अपवाद वगळता पूर्ण संघ अपयशी ठरल्यामुळे हा सामनाही कंटाळवाणा झाला. मध्य रेल्वेने तर मुंबई पोर्ट ट्रस्टला २६-९ असे चिरडले. हा सामनाही एकतर्फी झाल्यामुळे क्रीडाप्रेमींचा अक्षरशा हिरमोड झाला. पंकज मोहितेच्या सुसाट चढायांनीच पोर्ट ट्र्स्टची धुळधाण उडवली. पंकजची एकदाही पकड होऊ शकली नाही. त्याने १५ चढायांत १२ गुणांची नोंद केली.विनोद अत्याळकरनेही ७ गुण मिळवित त्याला चांगली साथ दिली.
आजचा केवळ युनियन बँक विरुद्ध मिडलाईन यांच्यातच थोडीशी चुरस पाहायला मिळाली. मिडलाइनच्या सागर जगताप आणि सौरभ यादवने युनियन बँकेच्या खेळाडूंना आपल्या जाळ्यात वारंवार अडकवत संघाला १८-१५ अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसर्‍या सत्रात सुयोग गायकरच्या वेगवान चढायांनी मिडलाईनला हादरवले. त्याने ९ गुण मिळवित मिडलाईनवर पहिला लोण चढवत संघाची पिछाडी भरून काढली. त्यानंतर प्रतिक बैलमारे (५) आणि ओमकार मोरे (६) यांनी पकडींचा जोरदार खेळ करीत मिडलाईनवर आणखी एक लोण चढवत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेर हा चढाई-पकडींचा खेळ युनियन बँकेने दुसर्‍या सत्रात २२ गुणांची नोंद करीत ३७-२९ असा जिंकला. मिडलाइन फाऊंडेशनचे खेळाडू दुसर्‍या सत्रात बँकेच्या आक्रमणाला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यांचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.

 127 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.