नीलपुष्पतर्फे संविधान काव्य संध्या साजरी

बौद्धभुमी कल्याण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, नीलपुष्पच्या ५० हून अधिक कवींनी संविधान आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या दोनच विषयांवर समर्पित कविता सादर केल्या.

कल्याण : आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त, नीलपुष्प साहित्य मंडळ, ठाणे तर्फे संविधान काव्य संध्येचे आयोजन करण्यात आले होते.
बौद्धभुमी कल्याण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, नीलपुष्पच्या ५० हून अधिक कवींनी संविधान आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या दोनच विषयांवर समर्पित कविता सादर केल्या. किर्ती खांडे, मोहसिना पठाण, शशिकला कुंभार, विश्वास गायकवाड, अनुपमा पाटील, सुरेखा गायकवाड, प्राची गोलतकर, उदय क्षीरसागर, सृष्टी गुजराथी यांनी उपस्थितांची विशेष दाद मिळविली. संविधानाचे विविध पैलू आणि आंबेडकरवादाचा दैनंदिन जीवनावरील प्रभाव, याबाबत यानिमित्ताने सखोल चिंतन झाले.
दलित, बहुजन हे शब्द आता मागे जाऊ देत. आंबेडकरवाद हा शब्द जास्त योग्य वाटतो. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहेत. त्यांना जागतिक मान्यता आहे. त्यांनी दिलेले संविधान सगळ्यांसाठी आहे. तिथे भेदभावाला जागा नाही तर सर्वसमावेशक विकासाचा विचार आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी केले.
साहित्यिकांनी अल्पसंतुष्ट असू नये. तर मनाचा तळ धुंडाळून पाहायला हवा. मन विशाल आहे. त्यात अमर्याद शक्यता सापडू शकतात. फक्त मोकळेपणाने स्वीकारण्याची वृत्ती हवी. असा विचार प्रा. दामोदर मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडला.
वाढदिवसाच्या औचित्याने झालेल्या या कार्यक्रमात प्रा. दामोदर मोरे यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक विठ्ठल शिंदे, शिवा इंगोले, कवी डाॅ. गंगाधर मेश्राम, गिरीश लटके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन, नीलपुष्प साहित्य मंडळाच्या उपाध्यक्षा नंदा कोकाटे यांनी केले. नवनाथ रणखांबे यांनी सुत्रसंचलनाची धुरा वाहिली.

 11,348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.