महाराष्ट्रात जन्मलेल्या व किमान १५ वर्षे सतत वास्तव्य असलेल्या वाल्मिकी मेहतर जातीच्या लोकांना जाती दाखला व जात वैधता प्रमाण पत्र द्यावे अशी आहे प्रमुख मागणी
ठाणे : पिढ्यांपिढ्या शहर स्वच्छतेची कामे करून वाल्मिकी मेहतर समाजातील लोकांनी महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी विशेष योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आहे. मग जातीच्या दाखल्यासाठी १९५० ची अट का ? महाराष्ट्रात जन्मलेल्या व किमान १५ वर्षे सतत वास्तव्य असलेल्या वाल्मिकी मेहतर जातीच्या लोकांना जाती दाखला व जात वैधता प्रमाण पत्र द्यावे अशी मागणी घेऊन नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाल्मिकी मेहतर समाज समन्वय समितीचे शिष्टमंडळाने भेट घेतली होती.
तेव्हा वाल्मिकी समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता करून घेण्यासाठी समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती व संघटीत ताकद उभारण्यासाठी महाराष्ट्र भर जिल्हा पातळीवर मेळावे, परिषदा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
जनसंपर्क करण्यासाठी वस्तीपातळीवर गेले पंधरा दिवस समितीचे निमंत्रक नरेश भगवाने, बीरपाल भाल, बिरसिंह पारछा, नंदकुमार शौदे,राजकुमार चौटेले, सतपाल मेहरोल, धर्मवीर मेहरोल, जगदीश खैरालिया आदी सभा बैठका करत आहेत. ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
वाल्मिकी मेहतर समाजाचा ठाणे जिल्हा मेळावा येत्या रविवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ आंबेडकर हौसिंग सोसायटीच्या प्रांगणात, स्टेडियम समोर, खारटन रोड, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी, रूखी समाजाचे विविध संघटनांचे नेते मार्गदर्शन करणार असून यावेळी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. मेळाव्यात अनुसूचित जातीचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. न्यायप्रेमी नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
3,728 total views, 1 views today