डोंबिवली क्रिकेट क्लबला विजेतेपद

युनियन क्रिकेट क्लबने ७ बाद २५३ धावसंख्येचे आव्हान डोंबिवली क्रिकेट क्लबने ३५.१ षटकात ३ बाद २५४ धावा करत पूर्ण केले.

ठाणे : कर्णधार अभिग्यान कुंडूने रचलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदाऱ्यांच्या जोरावर डोंबिवली क्रिकेट क्लबने युनियन क्रिकेट क्लबचा तब्बल सात विकेट्सनी पराभव करत जी के फणसे स्पोर्ट्स-कल्चरल फाऊंडेशन आणि ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित मुबंई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्ष वयोगटाच्या जी के फणसे स्मृती मर्यादित ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. युनियन क्रिकेट क्लबने ७ बाद २५३ धावसंख्येचे आव्हान डोंबिवली क्रिकेट क्लबने ३५.१ षटकात ३ बाद २५४ धावा करत पूर्ण केले.
सेंट्रल मैदानात खेळलेल्या सामन्यात डोंबिवली क्रिकेट संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेल्या निर्णयाने सगळेच अचंबित झाले होते. त्यात युनियन क्रिकेट क्लबने अडीच शतकी धावसंख्या उभारल्यामुळे सामन्याच्या निर्णयाबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. गौतम साठेने ५९ चेंडूत नाबाद ८३ धावा करत संघाला २५३ धावा उभारुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली. सिद्धांत बांदेकरने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकत ६३ धावांचे योगदान दिले. पार्थ त्रिम्बकरने २६ धावांत दोन तर शित रंभिया, पृथ्वी गोवारी आणि आदित्य पुजारीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करतांना दोन विकेट्स झटपट मिळवत युनियन क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी डोंबिवली क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण संघ अडचणीत असताना अभिग्यानने १५६ धावांची दमदार खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. अभिग्यानने मोक्याच्या क्षणी शौर्य देसाईच्या जोडीने ६८ धावांची आणि अथर्व मिंडेसह १४२ धावांची महत्वपुर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अभिग्यानने आपली दिडशतकी खेळी ९४ चेंडूत २० चौकार आणि सहा षटकारानिशी पूर्ण केली. अथर मिंडेने ५९ धावा केल्या. प्रतीक शुक्ला, सनी मौर्य आणि मित जैनने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संक्षिप्त धावफलक – युनियन क्रिकेट क्लब : ४० षटकात ७ बाद २५३ ( सिध्दांत बांदेकर ६३, गौतम साठे नाबाद ८३, पार्थ त्रिम्बकर ८-२६-२, शित रंभिया ७-६१-१, पृथ्वी गोवारी ८-३४-१, आदित्य पुजारी १-१३-१) पराभुत विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब : ३५.१ षटकात ३ बाद २५४ (अभिग्यान कुंडू १५६, अथर्व मिंडे ५९, प्रतीक शुक्ला ३-११-१, सनी मौर्य २-१-२७-१, मित जैन ८-४०-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – अभिग्यान कुंडू.
स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज :
अथर्व पालांडे ( डेक्कन क्रिकेट क्लब)
स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज : अनुराग मिश्रा ( डोंबिवली क्रिकेट क्लब)
स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : ऋषिकेश शिर्के ( स्पोर्टिंग क्लब कमिटी)

 2,096 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.