रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये आता हायटेक सुसंवाद

मोटोफिट्स ॲपच्या टॅबचे आमदार संजय केळकर यांच्याकडून लोकार्पण.

ठाणे : रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये मोटोफिटसचे ‘ऑटो सारथी’ हे हायटेक तंत्र सुसंवाद घडवणार आहे.असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांना विविध सुविधांसोबतच सुरक्षिततेची हमी देणारे मोटोफिट्स ॲप असलेल्या टॅबचे रिक्षाचालकांना लोकार्पण बुधवारी आ. केळकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, मराठी अभिनेता दिगंबर नाईक, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, मोटोफिटसचे सीईओ सचिन पोतदार, नितीन पोतदार तसेच, अबोली रिक्षाचालक अनामिका भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.केळकर यांनी,रिक्षात बसवलेले हे टॅब रिक्षाचालकांना चांगला मोबदलाही देणार असुन यामुळे रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारण्यास हातभार लागणार असल्याचे सांगितले. 
रिक्षाचालकांची मुजोरी तसेच प्रवाश्यांसोबत भाड्यावरून होणारे किरकोळ वाद ही नित्याचीच बाब बनली आहे. त्याचबरोबर, रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आल्याने महिला प्रवाशांशी गैरवर्तनाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांबाबत असलेली नाराजी आणि उभयतांमधील संबंध सुधारणारे ॲप ऑटोमोटोस या कंपनीने तयार केले आहे.हे ॲप असलेले टॅब रिक्षाचालकांना मोफत देण्यात आले असुन हे टॅब रिक्षाचालकांना चांगले उत्पन्न देणारे ठरत आहेत. या टॅबमध्ये व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यात येणार असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून रिक्षाचालकांना मासिक दोन हजार रुपये मोबदला आणि दोन लाखांचा विमा देण्यात येत आहे. एखादेवेळी प्रवाशांची तब्येत अचानक ढासळल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात नेल्यास तसेच शिवाय उत्तम प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकास प्रवाशांकडून रेटिंग देण्याची सुविधा टॅबमध्ये आहे. त्याचाही अतिरिक्त आर्थिक लाभ रिक्षाचालकांना मिळणार आहे. या टॅबमध्ये जाहिरातींबरोबरच विविध सेवा भरतीच्या अर्जाचे नमुने उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांसाठी प्रथमोपचार पेटीही रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे.विविध सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते आदी घटकांना त्यांच्या कार्याची आणि उपक्रमांची प्रसिद्धीदेखील या टॅबद्वारे करता येणार असल्याचे सीईओ सचिन पोतदार यांनी सांगितले.
प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक’ बटण
रिक्षात बसवलेल्या या टॅबमध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक’ बटण दिले असुन रिक्षाचालकांचे गैरवर्तन आढळल्यास टॅबला जोडलेले पॅनिक बटण प्रवाशाने दाबल्यास तात्काळ अलर्ट मोटोफिटसच्या सेंटरला पोहचणार आहे. टॅब व पॅनिक बटणमध्ये असलेल्या जीपीएसद्वारे अचुक वेळ, रिक्षाचा नंबर, रिक्षाचे लोकेशन आदी माहिती या संदेशातुन मिळाल्यानंतर तात्काळ नजीकच्या पोलीस स्थानकाला तसेच प्रवाश्यांना वैद्यकिय मदत पुरवता येणार असल्याचा दावा सचिन पोतदार यांनी केला आहे.
 

 17,111 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.