ठाण्यात गणेश मूर्तिकारांना ‘बाप्पा’ पावणार


तीन दिवसीय ‘गणांक २०२३’ महोत्सवात गणरायांच्या २०० अनोख्या मुर्त्यांचे प्रदर्शन
ठाणेकरांसाठी मूर्ती कार्यशाळा, चित्र प्रदर्शन, गणेश गीत गायन आदी कलांचा मेळा

ठाणे  : बाप्पाच्या विविध भावमुद्रेतील अनोख्या २०० मुर्त्यांचे प्रदर्शन…३० दिग्ग्ज चित्रकारांच्या चित्रांचे चित्र प्रदर्शन….मूर्ती कार्यशाळा….गणेश गीत गायन….अशा विविध कलांचा तीन दिवसीय मेळा ‘गणांक २०२३’ या अनोख्या महोत्सवाच्या माध्यमातून ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. गणेश मूर्तिकारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी मागील वर्षी श्री गणेश मूर्तिकला – कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तिकारांना पाठबळ मिळावे व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपल्बध करून देण्यासाठी आशुतोष नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने यंदा या संघटनेचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात ‘गणांक २०२३’ तीन हात नाका येथील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे २७ ते २९ जानेवारीदरम्यान होत आहे. कला जोपासक समीप सावंत फाउंडेशन व ठाणे आर्ट गिल्ड यांच्या माध्यमातून माघी गणेशोत्सवात होणाऱ्या या महोत्सवामुळे गणेश मूर्तिकारांना बाप्पा पावणार आहे. 
‘गणांक २०२३’ या महोत्सवाचा शुभारंभ धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार, २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. भाद्रपद आणि माघ महिन्यातले गणेशोत्सव पार पडले की, मूर्ती कारागीर तसे दुर्लक्षितच असतात. कौशल्य असूनही योग्य कागदपत्रांच्या अभावी त्यांना मूर्तीकामाची कंत्राटे मिळण्यास अडचणी येतात. याकरताच या संमेलनात गणपती कारागिरांकरता ई-श्रम कार्ड नोंदणी, पेन्शन योजना नोंदणी आणि आर्टिसन कार्ड वितरणही करण्यात येणार आहे. इच्छुक कारागिरांनी याकरता त्यांचे पासपोर्ट साईज ४ फोटो, बँक पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स घेऊन प्रदर्शनस्थळी येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ज्येष्ठ मूर्तिकारांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच सुप्रसिद्ध मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीने आपल्या बाप्पाची मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शनिवार, २८ जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रदर्शनस्थळी दिले जाणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्याकरता ७९७७८४६७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
*महान कलाप्रेमींचे व्यक्तिशिल्प घडवणार*
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोन्ही महान कलाप्रेमी व्यक्तींची याच आठवड्यात जयंती येत असल्याने त्याचे औचित्य साधत त्यांच्या व्यक्तिशिल्पांचे प्रात्यक्षिक शुक्रवार, २७ जानेवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५. ३० या वेळेत दाखवले जाणार आहे. यावेळी हे शिल्प घडविताना ‘याची देही याची डोळा’ कलाप्रेमींना पाहता येणार आहे.
*कौशल्य विकास कार्यशाळा*
गणपती मूर्तिकार – कारागिरांकरता शनिवार, २८ जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी १ या वेळेत कौशल्य विकास कार्यशाळा, सायंकाळी सहा ते आठ दरम्यान विद्यार्थ्यांकरता गणपती कथा चित्रकला स्पर्धा होणार असून रविवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध चित्रकार  अभिषेक आचार्य यांचे प्रात्यक्षिक आणि सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.

 8,553 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.