दिव्यांगांसाठी ‘मा’स्तर बना !

म्हाळगी व्याख्यानमालेत ‘दीपस्तंभ’ च्या यजुवेंद्र महाजन यांचे समाजाला आवाहन.

ठाणे : जन्मापासुन दिव्यांगाबाबत पुर्वग्रहदुषित विचार केला जात असल्याने भारतात कुठल्याही क्षेत्रात दिव्यांग उच्चपदावर नाहीत.याकरीता, पित्यापेक्षा मातेच्या स्तरावर विचार केल्यास दिव्यांग अपत्याचा उत्कर्ष होईल.तेव्हा, दिव्यांगांसाठी ‘मा’स्तर बना, असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांनी समाजाला केले आहे.
ठाण्यातील सरस्वती शाळेत आयोजित केलेल्या ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे ‘दीपस्तंभ – आधार निराधारांचा’ हे सहावे पुष्प यजुवेंद्र महाजन यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर उपस्थित होते. तर,श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर,सुहास जावडेकर आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
  २००५ सालापासुन कष्टाने उभ्या केलेल्या दीपस्तंभामुळे अनेक अनाथ, दिव्यांगांच्या भविष्याची वाट उजळली आहे. या वाटचालीची यशोगाथा उलगडताना यजुवेंद्र महाजन म्हणाले की, दिव्यांग मुलाबाबत हळहळ व्यक्त करण्याचे आपल्या समाजाचे विचार पुर्वग्रहदुषित आहेत. दिव्यांग मुलाबाबत एकवेळ बाप तक्रार करील. परंतु, कसेही असले तरी मातेला आपले मूल प्रिय असते.एकदा ठरवले की ‘माता’ कधीच मागे हटत नाही,तेव्हा मातेच्या स्तरावर जाता आले पाहीजे. म्हणजेच ‘मा’स्तर  व्हा. असे आवाहन त्यांनी केले. याच प्रेरणेतुन त्यांनी, हजारो अनाथ व दिव्यांगांना सक्षम करून उच्चपदस्थ बनवल्याचे सांगताना दृकश्राव्य पद्धती द्वारे श्रोत्यांशी थेट संवाद साधला.यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कारकिर्दीचे दाखले दिले. सुदृढ मानवी आयुष्यरूपी मिळालेल्या या भेटीची परतभेट (रिटर्न गिफ्ट) प्रत्येकाने करायलाच हवी. हे पटवुन देण्यासाठी त्यांनी श्रोत्यांमधीलच एका मुलीला उभे करून बोलते केले.या अनुषंगाने स्वतः राबवत असलेल्या एक विद्यार्थी पालकत्व योजनेचे महत्व अधोरेखित करून याकामी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तरच… भारत विश्वगुरू बनेल
  ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ तर्फे १५ राज्यातील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास-भोजनासह, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, कौशल्य प्रशिक्षण देणारे ‘मनोबल व संजीवन प्रकल्प पुणे व जळगाव जिल्ह्यात राबवले जात आहेत. त्यांच्या या संस्थेतून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी विविध सरकारी पदावर देशभर कार्यरत असुन चार दिव्यांग तर युपीएससीचा अभ्यास करीत असल्याचे महाजन यांनी सांगितले. आज पक्षभेद विसरून अनेक हात मदतीसाठी सरसावत आहेत, तरीही अशाप्रकारे काम करणाऱ्यांची संख्या देशभरात वाढली तरच, आपला भारत ‘विश्वगुरु’ बनेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

 427 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.