न्यू इंडियाला नमवून भारत पेट्रोलियम उपांत्य फेरीत

आकाश रुद्रेच्या दमदार चढाया तसेच निलेश शिंदे आणि आक्रम शेखच्या बहारदार पकडींनी भारत पेट्रोलियमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

पांचगणी : मुंबईच्या भारत पेट्रोलियम संघाने रोमहर्षक लढतीत न्यू इंडिया इन्शुरन्स संघाला २८-२३ असे नमवून पांचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित केलेल्या पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
भारत पेट्रोलियम हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आरामात जिंकेल अशी अपेक्षा फोल ठरली. रिशांक देवाडीगाच्या दोन पकडी झाल्यानंतर तिसऱ्या चढाईत तीन गुण मिळवत दमदार पुनरागमन केले. पहिल्या सत्रात भारत पेट्रोलियमकडे एका लोणसह १४-७ अशी आघाडी होती. पण दुसऱ्या सत्रात न्यू इंडिया इन्शुरन्सने खेळ उंचवला. पाच मिनिटे बाकी असताना न्यू इंडिया इन्शुरन्सने लोणची परतफेड करीत २६-२२ असे गुणसंख्येतील अंतर कमी केले. आकाश रुद्रेच्या दमदार चढाया तसेच निलेश शिंदे आणि आक्रम शेखच्या बहारदार पकडींनी भारत पेट्रोलियमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यू इंडिया इन्शुरन्सच्या केतन काळवणकर आणि सिद्धेश तटकरे यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला.
महिलांच्या अ-गटात सायली जाधवच्या धडाकेबाज चढायांच्या बळावर मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबचा ३२-१४ असा सहज पराभव केला आणि आपले खाते उघडले. सायली आणि स्नेहल चिंदरकर यांच्या चढायांमुळे गांधी अकादमीने मध्यंतराला घेतलेली १५-७ अशी आघाडी उत्तरार्धातही राखली. कर्नाळा स्पोर्ट्स क्लबकडून रचना म्हात्रे आणि रश्मी पाटील यांनी अप्रतिम खेळ केला.
पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा ६२-२१ असा धुव्वा उडवत ब-गटात दोन विजयांसह उपांत्य फेरीमधील स्थान निश्चित केले. राजमाता जिजाऊच्या सलोनी गजमल आणि मंदिरा कोमकरने झंझावाती चढाया केल्या, तर प्रियांका मांगलेकर आणि साक्षी रावडेने लक्षवेधी पकडी केल्या. स्वामी समर्थ संघाच्या साक्षी गिलबिले आणि ग्रीष्मा पवार यांनी छान खेळ केला.

 158 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.