स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही त्यांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा

कोपर्‍याची वाडीतील आदिवासी सुविधांसाठी प्रजासत्ताक दिनी करणार नृत्य आंदोलन

ठाणे : देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही कोपर्‍याची वाडी या अंबरनाथ तालुक्यातील आदिवासींना अपेक्षित असलेल्या सुविधा प्रशासनाकडून मिळालेल्या नाहीत. अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ या आदिवासींच्या वतीने चक्क नृत्य आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रिपाइं एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाला ओबीसी एकीकरण समितीनेही पाठिांबा दिला आहे. राजाभाऊ चव्हाण आणि ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे.
कोपर्‍याची वाडी हा आदिवासी पाडा इंग्रजी राजवटीच्या आधीपासूनच आहे. येथील आदिवासी बांधवांना नागरी सुविधांची पूर्तताच करण्यात आलेली नाही. सबंध अंबरनाथ तालुका नागरीकरणात आघाडीवर असला तरीही कोपर्‍याची वाडी येथे पायवाटा, नळपाणीपुरवठा योजना, दवाखाने आदी कोणत्याही व्यवस्था या ठिकाणी नाहीत. या गावात एक शाळा आहे. मात्र, या शाळेपर्यंत पोहचण्यासाठी सुयोग्य रस्ता नसल्याने शिक्षकही गावात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका आदिवासी पाड्यात येऊ शकत नसल्याने रुग्णांना किंवाा गरोदर महिलेला डोली करुन गुडघाभर चिखलातून न्यावे लागत आहे.
त्या प्रयत्नात अनेकांना आपली इहलोकीची यात्रा संपुष्टात आणावी लागत आहे. सन २०१७ मध्ये या गावाला कल्याणअंबरनाथशी जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम करुन त्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. मात्र, या पुलाला जोडरस्ताच तयार करण्यात आलेला नसल्याने हा पूल म्हणजे असून अडचण, नसून
खोळंबा असा झाला आहे. या संदर्भात २४ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावेळी
आम्हाला नागरी सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जवळपास तीन वर्षे उलटत असतानाही आम्हाला नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. उपरोक्त संदर्भानुसार ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक बैठकही पार पडली होती. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या संदर्भात अनेकवेळा आंदोलनांचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, कार्यवाही होत नसल्याने आम्ही आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, कार्यवाहीच झालेली नाही.
या कोपर्‍याच्या वाडीमध्ये प्रशासनाने पाहणीदौरा आयोजित करावा अन् प्रसूती रुग्णालय, शाळा, पायवाटा, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी नागरी सुविधा प्रदान कराव्यात; अन्यथा, येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी नृत्य आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सुमारे ५०० आदिवासी सहभागी होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत हे आदिवासी नृत्य करीत राहितील; त्यामध्ये आदिवासींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 12,191 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.