जिल्ह्याच्या जडण घडणीत विठ्ठल सायन्ना यांचे योगदान मोलाचे

ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिला विठ्ठल सायन्ना यांच्या आठवणींना उजाळा

ठाणे : ठाणे जिल्हा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना, सुरुवातीच्या जडण घडणीत मोलाचे योगदान असणाऱ्या व्यक्तींच्या पंक्तीत विठ्ठल सायन्ना यांचे नाव घ्यावेच लागेल. जिल्ह्याचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी त्यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी केलेली मदत मोलाची ठरली आहे. लवकरच विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाचे (सिव्हील हॉस्पिटल) सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार असले, तरी रुग्णालयातील हेरिटेज बिल्डिंगचे दगड तसेच महत्वाच्या वस्तू जतन केल्या जातील असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
सिव्हील रुग्णालयात विठ्ठल सायना यांची १५७ वी जयंती साजरी करण्यात आली. रुग्णालयातील विठ्ठल सायन्ना यांच्या पुतळ्याला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कैलास पवार बोलत होते. मुंबई ठाणे परिसरात विठ्ठल सायन्ना यांनी अनेक वास्तू उभारल्या आहेत. ठाण्यात सर्वसामान्यांसाठी एक रुग्णालय असावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा १९३५ मध्ये पूर्ण झाली. सायंना यांच्या मुलाने रुग्णालय बांधण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. आजच्या सिव्हील रुग्णालयाचा फायदा असंख्य रुग्णांनी घेतला आहे. गरिबांसाठी देवदूत असणाऱ्या या रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होताना. येथील हेरिटेज इमारतींचे दगड, तसेच इतर महत्वाच्या आठवणी जतन केल्या जाणार असल्याचे डॉ. कैलास पवार म्हणाले.
या कार्यक्रमाला डॉ. विलास साळवे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ.अर्चना पवार आदीसह मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 690 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.