शहरातील रस्त्यांच्या कामाचे आता ‘थर्ड पार्टी ऑडिट होणार

गुणवत्तापूर्ण रस्ता देण्यासाठी आयआयटीची ऑडिटर म्हणून नियुक्ती : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे : ठाण्याचे नागरिकरण झपाट्याने होत आहेत, या अनुषंगाने येथील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यादृष्टीकोनातून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत असतात, परिणामी दरवर्षी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते व वारंवार आर्थ‍िक खर्चही पालिकेला सोसावा लागतो. यापुढे महापालिकेमार्फत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सल्लागार व थर्ड पार्टी ऑडिटसाठी आयआयटीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस आयआयटीचे के.व्ही.कृष्णराव, उपनगरअभियंता रामदास शिंदे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे, या निधीअंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्याचे प्रस्तावित नागरिकांना गुणवत्तापुर्ण रस्ते मिळावेत यासाठी सल्लागार म्हणून व थर्ड पार्टी ऑडिटसाठी आयआयटीला नियुक्त केले जाणार असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
महापालिका कार्यक्षेत्रात सध्या सुरू असलेल्या व नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून या सर्व रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची व गुणवत्तापूर्वक व्हावी यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदारांनाही आयआयटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल यासाठी कार्यशाळेचे देखील आयोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचा आराखडा योग्य पध्दतीने तयार करुन कुठल्याही ठिकाणी पाणी साचणार नाही, रस्त्याच्या साईडपट्टीचे काम, पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होईल् या दृष्टीने रस्त्यांच्या दुतर्फा गटारे आदी गोष्टींचा समावेश करुनच काम करावे असेही आयुक्तांनी नमूद केले.
रस्त्याचे काम सुरू असताना प्रत्यक्ष जागेवर जावून कामाची पाहणी करण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणारे साहित्यांची योग्य दर्जाचे आहे की नाही याची देखील तपासणी आयआयटीच्या मार्गदर्शकांकडून करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी नमूद केले. रस्ते बांधकामासाठी लागणारे साहित्य (उदा. डांबराची गुणवत्ता) ज्या ठिकाणी बनविले जाते त्या युनिटला भेट देवून त्याची गुणवत्ता तपासली जाईल. तसेच ज्या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्याचे काम चालू आहे त्या साईटवर साहित्य येईपर्यत साहित्याचा तपशील ( Specification) आयआरसीच्या नॉर्म्सप्रमाणे राहिल याची दक्षता घेतली जावी, त्यासाठी प्लांटला व्हिजीट देणे, तसेच बांधलेल्या रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट (उदा. कॉक्रिट रस्त्यासाठी बीम टेस्ट करणे गरजेचे आहे ) असल्याचेही मत देखील व्यक्त केले. संपूर्ण काम हे महापालिकेच्या निविदेनुसार होत आहे की नाही यावर देखील कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे, जेणेकरुन रस्त्यांसाठी उपलब्ध केलेल्या निधीचे योग्य विनियोग होवून नागरिकांना चांगले व प्रशस्त रस्ते उपलब्ध होतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
सध्या सुरू असलेल्या व नव्याने प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच सदर कामांसाठी वेगवेगळे कंत्राटदार असल्याने त्यांच्यावर देखील आयआयटीचे पूर्ण लक्ष असले पाहिजे असेही आयुक्तांनी बैठकीत नमूद केले. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे फेब्रुवारी अखेरपर्यत व प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

 3,747 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.