ठाण्यातील गगनचुंबी इमारतीला ओसी नसतानाही रहिवाशांनी थाटली बिऱ्हाड

– नागरिकांना नाहक मनस्ताप
– विकासकाला पालिका अधिकाऱ्यांचे अभय : राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

ठाणे : कळवा, मुंब्रा, दिव्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले असताना ठाण्यातील उच्चभ्रू वसाहत अशी ओळख असलेल्या खेवरा सर्कल परिसरात इमारतीला ओसी (वापर परवाना) नसताना रहिवाशांनी बिऱ्हाड थाटली आहेत. ओसी नसताना ७० टक्के रहिवाशांनी घरांचा ताबा घेतला आहे. भविष्यात या २६ मजली इमारतीत दुर्घटना घडल्यास रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत विकासकावर कायदेशीर कारवाई करून त्याला पाठीशी घालणाऱ्या ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.    
ठाण्यातील खेवरा सर्कल परिसरात असलेल्या अँक्मे ओझोन गृहसंकुलातील हर्बेलिया या २६ मजली इमारतीला पालिका प्रशासनाकडून वापर परवाना देण्यात आलेला नाही. तीन लेव्हल पोडियमसह स्टिल्ट आणि २६ मजले असणाऱ्या या इमारतीत ओसी नसतानाही तब्बल ७० टक्के रहिवाशी आजमितीस वास्तव्य करत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उमेश अगरवाल यांनी समोर आणली आहे. मुंबईत आधीच गगनचुंबी इमारतींना लागणाऱ्या आगीत होणारी जीवितहानी व वित्तहानी लक्षात घेता भविष्यात ठाण्यातील अँक्मे ओझोन गृहसंकुलातील हर्बेलिया येथे दुर्घटना घडल्यास या प्रकाराला विकासकाला जबाबदार धरावे, अशी मागणी उमेश अगरवाल यांनी केली आहे. याआधीही संबंधित विकासकाच्या रेंटल इमारतीतील निकृष्ट बांधकामांवरून प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र तरीही या विकासकाला पाठीशी घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अगरवाल यांनी केली आहे.    
*बिल्डरकडून खुलासा मागवला*
हर्बेलिया प्रकल्पात तांत्रिक अडचणी असल्याने ओसी नसतानाही विकासकाने रहिवाशांना ताबा दिला आहे. एमएमआरडीएकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न मिळाल्याने पालिकेकडून अद्याप ओसी दिलेली नाही. याबाबत संबंधित विकासकाकडून खुलासा मागवल्याची माहिती ठाणे पालिकेच्या शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 1,035 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.