भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला डोंबिवली क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी १० षटकात अवघ्या २९ धावांत गुंडाळले.
मुंबई : डोंबिवली क्रिकेट क्लबने भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा दहा विकेट्सनी पराभव करत जी के फणसे स्पोर्ट्स-कल्चरल फाऊंडेशन आणि ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षे वयोगट मुलांच्या जी के फणसे स्मृती मर्यादित ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला डोंबिवली क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी १० षटकात अवघ्या २९ धावांत गुंडाळले. भिवंडीच्या फलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवताना अनुराग मिश्राने १९ धावांत ४ विकेट्स मिळवल्या. तर शित राभियाने सात धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विजयाचे छोटे आव्हान डोंबिवली क्रिकेट क्लबने बिनबाद ३० धावा करत पूर्ण केले.
अन्य लढतीत यजमान ठाणे फ्रेंड्स युनियन संघाने सनराईज क्रिकेट क्लबवर ८४ धावांनी विजय मिळवला.यजमानांच्या अमंथ हुसेनच्या नाबाद ६७ धावांमुळे ठाणे फ़्रेंडस युनियनला ८ बाद १८० धावा करता आल्या. नमन जवाहरने २६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर अनुज अय्यरने १२ धावांत ५ विकेट्स मिळवत सनराईज क्रिकेट क्लबला ९६ धावांत गुंडाळले.
1,830 total views, 1 views today