स्पोर्टिंग क्लब कमिटीची विजयी घोडदौड कायम

यासिन शेख, निल दाहिया ठरले संघाच्या मोठया विजयाचे शिल्पकार

ठाणे : यासिन शेखचा अष्टपैलू खेळ आणि निल दाहियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने प्राईम क्रिकेट क्लबचा १३० धावांनी धुव्वा उडवत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षाखालील मुलांच्या जी के फणसे स्मृती ४०षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. जी के फणसे स्पोर्ट्स-कल्चरल फाऊंडेशन आणि ठाणे फ्रेंड्स युनियन तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटीने दिलेल्या २०८ धावांना उत्तर देताना प्राईम क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला.
सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्टिंग क्लब कमिटीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे स्पोर्टिंगचा संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी यासिन शेखने ५९ धावांची खेळी करत संघाला द्विशतकी धावसंख्या पार करुन दिली. अथर्व अधिकारीने २०, लय धरमसी आणि निल दाहीयाने प्रत्येकी १८ धावा केल्या. स्पोर्टिंगच्या फलंदाजावर अंकुश ठेवताना सार्थक गोरेगावकरने ३४ धावांत ३, अद्वैत बेहेरे आणि केदार पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. स्पर्धेतील सलग दुसरा विजय संघाला मिळवून देताना यासिन शेखने दोन निर्धाव षटकांसह १३ धावांमध्ये तीन विकेट्स मिळवल्या. त्यापाठोपाठ निल दाहियाने दोन षटकांत दोन धावा देत तीन विकेट्स पटकावल्या. तन्मय जगतापनेही दोन आणि तुषार कारातूयाने एक फलंदाज बाद केला. प्राईम संघाकडून केदार पाटीलने ३३, अद्वैत बेहेरेने २० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – स्पोर्टिंग क्लब कमिटी : ३८.४ षटकात सर्वबाद २०८ (यासिन शेख ५९, अथर्व अधिकारी २०, लय धरमसी १८, निल दाहिया १८, सार्थक गोरेगावकर ८-३४-३, अद्वैत बेहेरे ८-३५-२, केदार पाटील ५.४-३७-२) विजयी विरुद्ध प्राईम क्रिकेट क्लब : २२.५ षटकात सर्वबाद ७८ ( केदार पाटील ३३, अद्वैत बेहेरे २०, यासिन शेख ५.५-२-१३-३, निल दाहिया २-२-३, तन्मय जगताप ४-०-९-२, तुषार कारातूया ५-२२-१) स्पोर्टिंग क्लब कमिटी १३० धावांनी विजयी. सामनावीर – यासिन शेख.

 2,082 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.