योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा

मनशक्ती आयोजित संस्कार विज्ञान सोहळ्याची सांगता समारंभात डॉ अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन

ठाणे : समोर येणारी प्रत्येक गोष्ट तपासून पहायची. योग्य असेल तर त्याचा स्वीकार आणि अयोग्य असेल तर ते त्यागण्याची विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांनी बाळगला पाहिजे. ही दृष्टी आत्मसात झाली म्हणजे आपल्याला सगळे आले, विज्ञान उमगले हा भ्रम अहंकाराकडे आणि पर्यायाने अधोगतीकडे नेतो, हा संस्कारही तितकाच महत्त्वाचा आहे, असा विचार ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडला.
मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्कार विज्ञान सोहळ्याचा सांगता समारंभ सोमवारी, ९ जानेवारीला ठाण्यात सीकेपी हॉल येथे पार पडला. या सोहळ्याला ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ व उद्योजक दीपक घैसास हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
विज्ञान आणि संस्कार दोन्हीचा उद्देश माणसाचे आयुष्य सुखी करणे हाच असतो. मात्र हे दोन्ही दुधारी शस्त्र आहेत. मनावर वाईट संस्कार होऊ शकतात आणि विज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन काळानुसार योग्य ते संस्कार स्वतःवर आणि पुढच्या पिढीवर केले पाहिजेत, असे दीपक घैसास यांनी सांगितले. आजच्या काळात सोशल मीडियावरचा वावर कसा असला पाहिजे, हाही संस्कार महत्वाचा आहे. पैसा म्हणजे सर्व काही नाही, ही गोष्ट मुळात पैसे कमावल्यानंतर शिकवण्याची आहे. प्रत्येक माणसाचा आदर करणे हा संस्कार आहे आणि तो नकळतपणे आपल्या कृतीतून झाला पाहिजे, अशी व्यावहारिक जगातील उदाहरणे देत त्यांनी बदलत्या संस्काराचे महत्त्व पटवून दिले. अशाप्रकारचे संस्कार सातत्याने होत राहिले की समूहाकडून तशी कृती घडत राहते आणि त्यातून संस्कृती जन्माला येते. हे अणू कडून अनंताकडे नेणारे विज्ञान आणि अनंताकडून सूक्ष्माकडे आणणारा विचार देण्याचे महत्वाचे कार्य मनशक्ती करत असल्या बद्दल त्यांनी कौतुक केले. 
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी मनशक्तीच्या कार्यामागची संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांची भूमिका, त्यांनी केलेले संशोधन उपस्थितांना सविस्तर समजावून सांगितले. क्षणागणीक बदलणाऱ्या माणसाच्या मनाचा शोध, त्याची आंदोलने आणि माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम याचा शोध स्वामीजींनी घेतला. त्याला विज्ञानाचा आधार देत कृतीचा संस्कार त्यांनी घडवला असे कुवळेकर यांनी स्पष्ट केले. असंख्य सुदृढ मने घडतील तेव्हा समाज, राष्ट्र मोठे होईल. सगळेच सज्जन होणार नाहीत पण सज्जन शक्ती वाढेल, या ध्यासाने स्वामीजींनंतरही संस्थेला सतत अभ्यास – संशोधनाने पुढे नेण्याचे काम करणाऱ्या मनशकातीच्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा पोवळे यांनी केले. मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे यांनी प्रास्ताविकातून या संस्कार विज्ञान सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली तर मनशक्तीचे विश्वस्त आणि संशोधन संचालक गजानन केळकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

 21,351 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.