श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते

भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धा

मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला.
पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु महिला विभागाचा निर्णायक सामना मात्र काहीसा एकतर्फी झाला.
पुरुष अ गटाच्या निर्णायक सामन्यात दहिसरच्या श्री सिद्धी संघाने गोरेगावच्या संघर्षाचा ३३-२० गुणांनी पराभव केला. विश्रांतीला पिछाडीवर पडलेल्या श्री सिद्धी संघाने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र जोरदार कमबॅक केले. श्री सिद्धीच्या विजयाचे शिल्पकार सागर सुर्वे, ओमप्रकाश जांगीड ठरले. सागरनेच त्यांची चढाईची बाजू समर्थपणे सांभाळली. त्याने एका तुफानी चढाईत सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ४ गडी टिपून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. त्याला ओमप्रकाशने सुरेख पकडी करून चांगली साथ दिली. पराभूत संघातर्फे दिपक रेमजे, मारुती झारळे यांची लढत एकाकी ठरली. विजेत्या श्री सिद्धीला २० हजार आणि संघर्षला १५ हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. पुरुषांच्या ब गटात बाजी मारताना दहिसरच्या श्री शंभूराजे क्रीडा मंडळाने दहिसरच्याच रत्नदिप क्रीडा मंडळाचे जोरदार आव्हान ३२-३१ गुणांनी परतावून लावले. विश्रांतीला ७ गुणांची मोठी आघाडी घेणाऱ्या श्री शंभूराजे क्रीडा मंडळाला दुसऱ्या सत्रात रत्नदिपने जोरदार झुंज दिली. विजयी संघाच्या ऋतिक भुवडने खोलवर चढाया करून बरेच गुण मिळवले. तर जयेश शेट्टीने सफाईदार पकडी केल्या. पराभूत संघातर्फे मुथ्थू कुमार आणि सुशांत जांगली यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. विजेत्या श्री शंभूराजेला १५ हजार आणि उपविजेत्या रत्नदिपला १० हजार रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
महिलांच्या एकतर्फी अंतिम सामन्यात मालाडच्या वंदेमातरम् क्रीडा मंडळाने बोरीवलीच्या ओम नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाला ५४-३१ गुणांनी सहज नमविले. रिया निंबाळकर, प्रसिता पन्हाळकर, नम्रता खेरटकर यांच्या दमदार खेळाच्या समोर ओम महाराष्ट्रची डाळ शिजली नाही. प्रसिताने शानदार अष्टपैलू खेळ केला तर रिया, नम्रताने पल्लेदार चढाया केल्या. पराभूत संघाच्या करिष्मा म्हात्रेची झुंज अपयशी ठरली. विजेता वंदेमातरम् संघ १५ हजार आणि उपविजेत्या ओम नव महाराष्ट्र संघ १० हजार रुपयांचा मानकरी ठरला. स्पर्धेत पुरुष अ गटात सागर सुर्वे (श्री सिद्धी क्रीडा मंडळ), ब गटात विक्रांत गोरिवले (श्री शंभूराजे क्रीडा मंडळ),  महिला विभागात करिष्मा म्हात्रे (ओम नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ) हे तिघे सर्वोत्तम खेळाडूचे मानकरी ठरले. संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन आणि सामन्याचे समालोचन आपल्या खास शैलीत करून राजेश कुळेने  क्रीडा प्रेमींची मने जिंकली. पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, अॅड. जयप्रकाश मिश्रा, गणेश बारे आणि संतोष सिंग यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने कबड्डीपटूंना प्रती सामना प्रत्येक खेळाडूला ५०० रुपये मानधन देऊन एक नवा पायंडा  सुरू केला, त्याबद्दल कबड्डी वर्तुळात त्याचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले आहे.

 223 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.