पत्रकार संघाने उचलली मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी
ठाणे : पत्रकार रवींद्र खर्डीकर यांच्या शोक सभेला आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने खर्डीकर यांच्या १० वर्षीय मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. २७ डिसेंबर रोजी त्यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. रविवारी ठाण्यात त्यांची शोकसभा झाली.
पत्रकार रवींद्र खर्डीकर हे ठाण्यातील डिजीटल मीडिया न्युज चालवायचे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना फुप्फुसाच्या कर्करोग झाला होता. त्यांच्यावर ठाण्यात बेथनी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच २७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सोमवारी अशार संजीव गृहनिर्माण सोसायटी येथे त्यांच्या राहत्या घरी रविवार , ८ जानेवारी रोजी उत्तर कार्य आणि शोक सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजीमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज शिंदे, डॉ. राजेश मढवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, युवक काँग्रेसचे बिंद्रा, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, जेष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, जेष्ठ पत्रकार दीपक दळवी, दिलीप शिंदे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे विकास काटे, अमोल सुर्वे, गणेश पारकर, संजय भालेराव यांसह संघाचे सर्व पत्रकार उपस्थित होते. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रवींद्र खर्डीकर यांच्या पत्नीस एक लाख रुपये, डॉ. राजेश मढवी यांनी एक लाख रुपये, ठाणे शहर पत्रकार संघाने दोन लाख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाख रुपयांची मदत दिली. तर पत्रकार संघाने खर्डीकर यांच्या १० वर्षीय मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचे जाहीर केले. काही नगरसेवक आणि राजकीय पुढाऱ्यांनीही खर्डीकर कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. यावेळी पत्रकार संघ त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असे पत्रकार कैलास म्हापदी, संजय पितळे यांनी जाहीर केले.
18,595 total views, 1 views today