महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेने पटकावला हिंद केसरी किताब


अभिजितने तेलंगणाच्या भूमीत नवा इतिहास रचताना हरियाणाच्या सोमवीरचा ५ विरुध्द ० गुणांनी एकतर्फी फडशा पाडीत देशातील कुस्ती क्षेत्रातील मानाचा हिदकेसरी किताब जिंकला.

ठाणे : महाराष्ट्र केसरी ‘किताब विजेत्या पुण्याच्या अभिजित कटकेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचताना हिंद केसरी किताबावर आपले नाव कोरले.
हैद्राबाद येथे भारतीय शैली कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या ५१ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके (महाराष्ट्र) विरुद्ध सोमवीर (हरियाणा) यांच्यात हिंदकेसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजीतने सोमवीरला आक्रमणाची संधी मिळून दिली नाही. गुणांची बढत घेऊन सोमवीरवर दबाव वाढवला.
दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सुचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सुचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला मात्र अभिजित पुढे त्याची डाळ शिजली नाही. पाच विरुद्ध शुन्य गुणांची कमाई करून अभिजीतने प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली.
अभिजीत पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी,भारत केसरी किताब जिंकला आहे. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने पटकावला आहे.

 9,597 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.