मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आयोजित, माईंड जिम विज्ञान संस्कार सोहळ्याच्या ‘दीपस्तंभाच्या शोधात’ या सत्रात साधला युवकांशी संवाद
ठाणे : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेटलेल्या व्यक्ति या आपल्यासाठी दीपस्तंभासारखे असतातच; पण आपला संघर्ष, बिकटवाट, प्रतिकूल परिस्थितीदेखील आपल्यासाठी दीपस्तंभ असते. त्यामुळे बाहेर कुठेही दीपस्तंभ शोधायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या आत दीपस्तंभ दडलेला आहे. भगवान गौतम बौद्धानी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही स्वयं प्रकाशित व्हा! असा विचार जेष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील सीकेपी हॉल येथे, मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आयोजित, माईंड जिम विज्ञान संस्कार सोहळ्याच्या ‘दीपस्तंभाच्या शोधात’ या युवासंवाद सत्रात त्यांनी युवकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दवणे म्हणाले की, स्मार्टफोन देणाऱ्या आई-बाबानी मुलांच्या हातात महापुरुषांची चरित्रग्रंथ द्यायला हवीत. तरच मुलांना महापुरुषांचा समृद्ध इतिहास वाचता येईल. मला सांस्कृतिक इयत्ता लाभलेल्या सरोजनी वैद्य, शांताबाई शेळके यांसारखे गुरु भेटल्याने विद्यार्थी दशेतच वळण लागल्याचे ते म्हणाले. घरच विद्यापीठ आणि विदयापीठ हेच घर असल्याने आयुष्य समृद्ध झाल्याचेही श्री. दवणे म्हणाले. तुमच्या सामर्थ्यावर यश मिळवायला शिका, अपयश आलंच तर न डगमगता सामोरे जा असा सल्लाही त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना दिला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, दीपस्तंभ हे दिशादर्शक आहे. अशा दिशादर्शकांना शोधण्याची संधी मिळाली ती पत्रकार म्हणून. पत्रकरिता करताना भेटलेल्या दीपस्तभांमुळे माझी निर्णय प्रक्रिया समृद्ध झाली. कोकणातील मत्स्य व्यवसायक दीपक गद्रे हे माझ्यासाठी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या व्यवसायिक आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि तेही कोणताही चुकीचा मार्ग न अवलंबता. अशावेळी चांगला दीपस्तंभ तुम्हाला भेटायला हवा. माझ्या सुदैवाने मनशक्ती ही संस्था माझ्या आयुष्यात आहे, याचा आनंद असल्याची प्रांजल भावना त्यांनी व्यक्त केली. दररोज जो आपल्याला भेटेल त्याच्यातील चांगले गुण शोधणे आणि वाईट जरी कोणी भेटला तरी त्याच्या सारखं वाईट न वागणे हा गुण घेणे म्हणजेच तुम्ही चांगल्या दीपस्तंभाच्या शोधात असल्याचे लक्षण असल्याचे खरे म्हणाले. यावेळी सोशल मीडियावरचं अतिरेकी वापरावर नियंत्रण आणायला हवे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी मनशक्तीच्या जीवनदानी साधक स्वाती अळूरकर यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले.
दरम्यान कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर जीवनदानी साधक गजानन केळकर यांनी आभार मानले. प्रा. वर्षा तोडमल यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.
2,197 total views, 1 views today