शिवशक्ती महिला संघाची “आमदार चषकाच्या” विजयाने नववर्षाची सुरुवात

 

शिवशक्तीचे हे या मोसमातील चौथे राज्यस्तरीय जेतेपद.बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने मारली पुरुष गटात बाजी. स्वस्तिकचा आकाश रूडले आणि शिवशक्तीची अपेक्षा टाकळे स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरले. – बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

 मुंबई : बंड्या मारुती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या बाबुराव चांदेरे फौंडेशनने पुरुषांत, तर मुंबई शहराच्या शिवशक्ती संघाने महिलांत विजेतेपद पटकाविले. स्वस्तिकचा आकाश रूडले पुरुषांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रुपये पंचवीस हजार देऊन गौरविण्यात आले. तर शिवशक्तीची अपेक्षा टाकळे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख रुपये पंधरा हजार देऊन सन्मानित करण्यात आले. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाचा प्रतिकार ३५-१९ असा सहज मोडून काढत “आमदार चषक” व रोख रुपये एक लाख आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या स्वस्तिकला चषक व रोख रुपये पासष्ट हजारवर समाधान मानावे लागले. नांदेडकरांनी आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटातच स्वस्तिकवर लोण देत १०-०१ अशी आघाडी घेतली. पण स्वस्तिकने देखील त्यानंतर जशास तसे उत्तर देत हा लोण फेडत ही आघाडी ११-१२ अशी कमी केली. मध्यांतराला १५-१३ अशी फौंडेशनकडे आघाडी होती. पहिल्या डावात चुरशीने खेळला गेलेला हा सामना दुसऱ्या डावात मात्र एकतर्फी झाला. दुसऱ्या डावात टॉप गिअर टाकत बी. सी. फौंडेशनने आपला खेळ अधिक गतिमान करीत आणखी दोन लोण स्वस्तिकवर चढविले. स्वस्तिककडे या आक्रमकतेला उत्तर नव्हते. दुसऱ्या डावात फौंडेशनने २३ गुणांची कमाई केली तर स्वस्तिकला अवघे ६गुण मिळविता आले. यावरून दोन संघातील आक्रमकतेचे चित्र स्पष्ट होते. अक्षय जाधव, अजित चौहान, अक्षय सूर्यवंशी यांच्या झंजावाती चढाया रोखण्यात स्वस्तिकला अपयश आले.  त्याच बरोबर विकास काळे, राम जगदाळे यांचा बचाव भेदने स्वस्तिकला कठीण गेले. दुसऱ्या डावात तर ते पार ढेपाळले. स्वस्तिकचा आकाश रूडले, संकेत साळकर वगळता अन्य कोणी फारसा प्रतिकार केला नाही. त्यामुळेच बाबुराव चांदेरेने या स्पर्धेवर सहज विजेतेपदाची मोहर उमटविला.
महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ३९-१८ असा सहज पाडाव करीत “आमदार चषक” व रोख रुपये पासष्ट हजाराचा धनादेश आपल्या नावे केला. उपविजेत्या महात्मा गांधीला चषक व रोख रुपये पंचेचाळीस हजार प्रदान करण्यात आले. शिवशक्तीने सुरुवातच झंजावाताने करीत महात्मा गांधीला पुरते नामोहरम केले. धारदार चढाया व भक्कम पकडी करीत शिवशक्तीने पूर्वार्धातच प्रतिस्पर्ध्यावर ३लोण चढवित ३१-०९ अशी भक्कम आघाडी घेतली. या आघाडीने खचलेल्या महात्मा गांधीकडून उत्तरार्धात फारसा प्रतिकार झालाच नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या शिवशक्तीने सामना लीलया आपल्या बाजूने झुकविला. सोनाली शिंगटे, अपेक्षा टाकले, रेखा सावंत यांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य महात्मा गांधींकडे नव्हते. मीनल जाधव, करीना कामतेकर  यांचा थोडाफार प्रतिकार वगळता अन्य कोणाकडून तसा प्रयत्न झाला नाही. 
या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात बाबुराव चांदेरेने चेतक स्पोर्ट्सचा ३१-२६ असा तर स्वस्तिकने गुड मॉर्निंगचा ४१-२७ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी चेतक व गुड मॉर्निंग या दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रुपये पंचवीस हजार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांत शिवशक्तीने धुळ्याच्या शिवशक्तीला ५७-२७ असे तर महात्मा गांधीने नवशक्तीला ३५-२१ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही महिला संघाना प्रत्येकी चषक व रोख रुपये पंधरा हजार प्रदान करण्यात आले. पुरुषांत बाबुराव चांदेरे फौंडेशनचा अक्षय सूर्यवंशी उत्तम चढाईचा, तर चेतक स्पोर्ट्सचा अक्षय बोडके उत्तम पकडीचा खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना रोख रुपये पंधरा हजार देऊन गौरविण्यात आले. महिलांत शिवशक्तीची सोनाली शिंगटे उत्कृष्ट चढाईची, तर महात्मा गांधींची करीना कामतेकर उत्कृष्ट पकडीची खेळाडू ठरली. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रुपये दहा हजार देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, पुण्याचे बाबुराव चांदेरे, स्पर्धा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.

 336 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.