मनशक्ती माईंड जिम संस्कार विज्ञान सोहळ्यात रंगले
सन्मान सत्कृत्याचे गौरवाष्टक


ठाण्यातील विविध क्षेत्रातील आठ मान्यवरांचा जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अशोक मोडक यांच्या हस्ते सन्मान.

ठाणे : सत्कृत्य करणाऱ्यांचा सन्मान, सत्कृत्य करणाऱ्यांचे एकत्रीकरण म्हणजेच संगतीकरण आणि भावी पिढीला संस्कारांचे दान या स्वामी विज्ञानानंदांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीवर आधारित ‘सन्मान सत्कृत्य सोहळ्या’त असामान्य कार्य उभारणाऱ्या आठजणांचा सन्मान करण्यात आला.
ठाण्यात सुरू असलेल्या ‘मनशक्ती माईंड जिम संस्कार विज्ञान सोहळ्या’ची शनिवारची संध्या या गौरवक्षणांनी रंगली.
शिक्षणतज्ज्ञ रती भोसेकर, आजारी प्राण्यावर उपचार करणारे डॉ. अर्चना आणि गणराज जैन, पर्यावरण तज्ज्ञ प्रसाद कर्णिक, विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक विश्वस्त गीता सत्यजित शाह, जागृती पालक संघांचे अध्यक्ष सतीश धुरत, सिग्नल शाळेचे भटू सावंत, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.उल्का नातू, जिद्द शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्यामश्री भोसले आदी मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. अशोक मोडक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, जेष्ठ साधक सुधाकर पाठक उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.अशोक मोडक यांनी ठाणे शहराला ज्यांनी लौकिक मिळवून दिला त्या अलौकिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मनशक्तीने आयोजित केलेला सन्मान सत्कृत्याचा सोहळा विविध अर्थाने महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थात्मक परिवर्तन कधीही फलदायी होत नाही हे इतिहासातील घटनांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यासाठी मानसिक परिवर्तनच गरजेचे आहे हे मनशक्तीने गेल्या पाच दशकात उभारलेल्या कार्यातून सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले.
भोगप्रियता, स्वच्छंदीपणा आणि संस्कृतीहीनता समाजात बोकाळली असताना भविष्याकडे आशावादीपणे पाहण्याची दृष्टी मनशक्तीने आपल्या अभ्यास- संशोधनकार्यातून दिली आहे, अशा शब्दांत त्यांनी मनशक्तीच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी कार्य करणाऱ्यांचा आज झालेला सत्कार हा सर्वार्थाने शाश्वत विकासाचा प्रयत्न असून त्यातूनच मानवतेचे कल्याण होईल, असेही त्यांनी नमूद केले. बा. भ. बोरकरांच्या ‘जीवन त्यांना कळले हो’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देण्याची भावना समाजमनात रुजली पाहिजे, वाढली पाहिजे. एकमेकांशी समन्वयाने, जुळवून घेऊन पुढे जात राहिलो तर देश गुण्यागोविंदाने नांदेल, असे प्रमोद शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. या कार्यक्रमानंतर ‘मनाचा विकास आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील विवेचन पार पडले.

 25,668 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.