महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला कास्यपदक

२७ वी राष्ट्रीय् रोड रेस स्पर्धा –
पहिल्या दिवसावर राजस्थानचे वर्चस्व

सिन्नर : २७ व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेतील पहिला दिवस राजस्थानच्या सायकलपटूंनी गाजवला. टाईम ट्रायल विभागात महीलांच्या एलिट गटात राजस्थानच्या कविता सिंगने तर महिलांच्या सबज्युनियर गटात राजस्थानच्या माया दुडीने सुवर्णपदक पटाकवले. महिलांच्या सबज्युनियर गटात महाराष्ट्राच्या पूजा दानोळेने कास्यपदक पटकावत महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समृध्दि महामार्गावर या रोडरेस सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या एलिट विभागातील ३० किलोमीटरच्या टाईम ट्रायलमध्ये ३८.७५ किलोमीटर प्रतितास वेगाची नोंद राजस्थानच्या कविता सिंगने नोंदविली. तीने ४६ मिनिटे २७ सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदक पटाकावले. रेल्वेच्या मोनिका जाटने ४६ मिनिटे ५१.२७९ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर कर्नाटकची चैत्र बोर्जीने ४७ मिनिटे ०७.३७२ सेकंदाची वेळ देत कास्यपदक जिंकले.
महिलांच्या ज्युनिअर गटात राजस्थानच्या माया दुडीने वीस किलोमीटरचे अंतर ३१ मिनेट ५७.४०४ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदक जिंकले. हरियाणाच्या अंजुने ३२ मिनिटे २५.६५१ सेकंद तर महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने ३२ मिनिटे २५.९४० सेकंदाची वेळ देत अनुक्रमे रौप्य आणि कास्यपदक जिंकले.
पुरुषांच्या ४० किलोमीटर टाईम ट्रायल कर्नाटकच्या नवीन जॉनने ५१ मिनिटे २१.०१४ सेकंदाची वेळ देत सुवर्णपदक पटकावले. त्याने स्पर्धेत प्रतितास ४६.७४ किलोमीटरची वेग नोंदविला. रेल्वेच्या विश्वजीत सिंगने ५१ मिनिटे ४३.९२५ सेंकदाची तर सेनेच्या दिनेश कुमारने ५३ मिनिटे १४.४३७ सेकंदाची वेळ देत अनुक्रमे रौप्य आणि कास्यपदक जिंकले.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरीश बैजल, नाशिक जिल्हा परिषद च्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकानेच व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सायकलिंगच्या माध्यमातून आपण व्यायामाची गरज भागवू शकतो. तसेच प्रदूषण विरहित सायकलिंगमुळे पर्यावरण संवर्धनास देखील हातभार लावू शकतो. केवळ स्पर्धेत खेळण्यापुरते नाही तर एरवीदेखील सायकलचा वापर वाढवणे गरजेचे आहे .असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी पोलीस अधिकारी हरीश बैजल यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटन सत्रासाठी महाराष्ट्र सायकलींग फेडरेशनचे प्रताप जाधव, धनंजय वानखेडे, अविनाश कदम, अभयसिंह जाधवराव, प्राध्यापक संजय साठे, तुकाराम नवले, निसर्गराज सोनवणे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पाथरे खुर्दचे उपसरपंच दत्तात्रय चिने, पाथरे बुद्रुकच्या सरपंच सुजाता नरोडे, वारेगावचे सरपंच मंदाकिनी दवंगे, पोहेगावचे सरपंच अमोल औताडे, अरुण येवले, संजय औताडे , रामनाथ चीने, मंगला मोकळ, सुवर्णा दवंगे, गणेश पाटील, दिलीप चिने, कैलास चिने, संदीप ढवण, अच्युत हगवटे, बाळासाहेब राहाणे, सुखदेव वैराळ, गोरख पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सिन्नर तालुक्यातील पाथरे ते सोनारी दरम्यान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी पासून जवळच असलेल्या पाथरे येथे स्पर्धेचा स्टार्ट पॉइंट असून या स्पर्धेत देशातील ३१ राज्य व क्रीडा मंडळाचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमधून नॅशनल सायकलींग अकॅडमी साठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहेत.

 173 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.