गुड मॉर्निंग, स्वस्तिक क्रीडा, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, चेतक स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

    बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

 

मुंबई : बंड्या मारुती सेवा मंडळाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. मान्यतेने आयोजित केलेल्या ” आमदार चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गुड मॉर्निंग, स्वस्तिक क्रीडा, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन व चेतक स्पोर्ट्स यांनी पुरुषांत, तर शिवशक्ती महिला, शिवशक्ती-नांदेड, महात्मा गांधी, नवशक्ती स्पोर्ट्स यांनी महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली. गुड मॉर्निंग विरुद्ध स्वस्तिक, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन विरुद्ध चेतक स्पोर्ट्स अशा पुरुषांत, तर शिवशक्ती महिला विरुद्ध शिवशक्ती-धुळे, महात्मा गांधी विरुद्ध नवशक्ती स्पोर्ट्स आशा महिलांत उपांत्य लढती होतील. श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या गुड मॉर्निंगने अत्यंत चुरशीच्या लढतीत पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनला ३०-२८ असे चकवीत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात १३-१४ अशा पिछाडीवर पडलेल्या गुड मॉर्निंगने दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत ही किमया साधली. सुनील राणे, शार्दूल पाटील यांच्या चढाया व स्वप्नील भादवणकर याचा भक्कम बचाव यामुळे हा विजय शक्य झाला. बी. सी. फौंडेशनच्या प्रवीण वावरे, पृथ्वीराज चव्हाण यांचा पहिल्या डावातील जोश दुसऱ्या डावात थोडा कमी पडला.
उपनगरच्या स्वस्तिकने मुंबईच्या विजय क्लबचा ५२-१७ असा धुव्वा उडवीत आरामात उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीला २९-१० अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने विश्रांतीनंतर देखील आपला जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. आकाश रूडले, प्रफुल्ल चव्हाण यांच्या झंजावाती चढाया त्यांना संकेत साळसकर, हृतिक कांबळी यांची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे स्वस्तिकने हा विजय साकारला. विजयचा प्रतिकार आज अगदीच दुबळा ठरला. नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने रायगडच्या मिड-लाईनचा प्रतिकार ३३-२६ असा मोडून काढत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अक्षय सूर्यवंशी, अक्षय जाधव यांच्या धडाकेबाज चढाया व राम जगदाळे याचा संयमी बचाव यामुळे मध्यांतराला १६-०७ अशी आघाडी घेणाऱ्या फौंडेशनने मध्यांतरानंतर सावध खेळ करीत आहे ती आघाडी टिकवीत हा विजय साकारला. मिडलाईनच्या सुयोग गायकर, वैभव मोरे यांनी उत्तरार्धात बऱ्यापैकी प्रतिकार केला. पुण्याच्या चेतक स्पोर्ट्सने रत्नागिरी-चिपळूणच्या वाघजाई मंडळाचे आव्हान २४-२१ असे मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या सत्रात १०-०८ अशी आघाडी घेणाऱ्या चेतकने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखत ते शेवटपर्यंत टिकविले. समीर ढोकले, आशिष पडाले यांच्या संयमी चढाया आणि कृष्णा शिंदे, बालाजी जाधव यांचे उत्तम क्षेत्ररक्षण यांच्या बळावर चेतकने हा विजय साकारला. अजिंक्य पवार, ओमकार कदम, सचिन मोडक यांनी वाघजाईला विजय मिळवून देण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण त्यांना अपयश आले.
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या शिवशक्तीने मुंबईच्या श्री स्वामी समर्थला ५६-१९ असे सहज नमवित आपणच या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार हे दाखवून दिले. सुरुवातीपासूनच जोशपूर्ण खेळ करीत पहिल्या डावातच २९-०७ अशी आघाडी घेत सामनाच नव्हे, तर स्पर्धा देखील आपणच जिंकणार हे दाखवून दिले. दुसऱ्या डावात देखील तो जोश कायम राखत ३५ गुणांच्या मोठ्या फरकाने दिमाखात उपांत्य फेरी गाठली. रिद्धी हडकर, ऋणाली भुवड यांच्या झंजावाती चढाया आणि सोनाली शिंगटेचा संयमी बचाव यामुळे शिवशक्तीने हा मोठा विजय साकारला. श्री स्वामी समर्थची राई शिंदे एकाकी लढली. धुळ्याच्या शिवशक्तीने ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहू संघाला ३४-३२ असे चकवीत आपली आगेकूच सुरू ठेवली. विश्रांतीला दोन्ही संघ १८-१८ असे बरोबरीत होते. सुरुवातीपासून चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी शिवशक्तीने बाजी मारली. ऋतुजा दोलमाने, ऋतुजा बांदिवडेकर, पूजा यादव यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ज्योती विश्वकर्मा, साधना यादव, संध्या यादव यांचा धडाडीचा खेळ शाहू संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला.
उपनगरच्या नवशक्तीने ५-५ चढायांच्या डावात मुंबईच्या विश्वशांतीचे कडवे आव्हान ३६-३५(६-५) असे परतवीत उपांत्य फेरीत धडक दिली. जुन्या जमान्यातील विश्वशांती हा नावाजलेला संघ काळाच्या ओघात हरविला होता. आज तो पुन्हा जोमाने प्रगती करताना दिसत आहे. रोझी डिसोझा, भारती यादव, आकांक्षा जाधव यांच्या चतुरस्त्र खेळाने पूर्वार्धात १८- १६ अशी आघाडी घेणाऱ्या विश्वशांतीला उत्तरार्धात नवशक्तीने ३०-३० असे बरोबरीत रोखले. त्यानंतर ५-५ चढायांच्या डावात देखील ६गुण घेत सामना आपल्या बाजूने झुकविला. बेबी जाधव, विज्योति गोळे, प्रविणा थोरात यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधीने मुंबईच्या डॉ.शिरोडकरचा ४३-२२ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला २७-०९ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. करीना कामतेकर, शीतल जाधव, करुणा रासम महात्मा गांधीकडून तर श्रावणी घाडीगांवकर, नेहा कदम शिरोडकरकडून उत्कृष्ट खेळल्या.

 158 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.