प्रशांत सिनकर ‘चौथा स्तंभ विशेष’ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

२०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार तसेच निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष विजेते निवडताना लावण्यात आले होते.

ठाणे : पत्रकारितेमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल दिला जाणारा अप्रतिम मीडिया, पुणे यांचा पर्यावरण वृत्त गटात दिला जाणारा ‘चौथा स्तंभ’ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार पर्यावरण अभ्यासक पत्रकार प्रशांत सिनकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नरिमन पॉइंट येथील यशवंराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अप्रतिम मीडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विकास पत्रकारितेतील या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, अभिनेते मंगेश देसाई, अप्रतिम मिडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदी उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यमातील प्रतिनिधींचे नामांकन करण्यात आले होते. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार तसेच निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष विजेते निवडताना लावण्यात आले होते.
प्रशांत सिनकर यांनी ‘ठाणे खाडी’ हा विषय घेऊन त्याची सखोल माहिती दिली होती. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी चर्चेत भाग घेऊन खाडी संवर्धनाविषयी सखोल मार्गदर्शन केले होते.
या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव, वने इको टुरिझम, पर्यावरण, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक, ग्रामीण विकास, धार्मिक, सामाजिक, राजकीय गुन्हेगारी वृत्त आदी विविध प्रकारात वेब संवादाद्वारे समस्यांची उकल करण्यात आली होती. राज्यभरातून या पुरस्कारासाठी अनेक नामांकने आली होती. निवडप्रक्रिया करणे खूप अवघड झाले होते, परंतु तज्ज्ञमंडळींच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. अनिल फळे यांनी दिली. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
प्रशांत सिनकर यांना याआधी महाराष्ट्र शासनाचा शि. म. परांजपे पुरस्कार, नेपाळ सरकारचा ‘नेपाळ इको-२०१३’, ‘भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण’, ठाणे महापालिकेचा ‘ठाणे गुणिजन, ठाणे गौरव सारस्वत चैतन्य’, रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचा ‘व्होकेशनल एक्सलन्स’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 6,505 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.