विजय क्लब, विजय नवनाथ, गुड मॉर्निंग, गोल्फादेवीची आगेकूच कायम

    बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

   मुंबई : विजय क्लब, विजय नवनाथ, गुड मॉर्निंग, गोलफादेवी, अमर क्रीडा व जय भारत क्रीडा या मुंबईच्या पुरुष संघाबरोबर पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, उपनगरच्या स्वस्तिक, ठाण्याच्या शिवशंकर, व रत्नागिरीच्या वाघजाई  मंडळाने बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित ” आमदार चषक”  राज्यस्तरीय पुरुषांत बाद फेरी गाठली. पुरुषाचे चार साखळी सामने बाकी असून या सामन्याच्या निकालावर कोणते चार संघ बाद फेरी गाठतील हे नक्की होईल.
श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या आजच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या अ गटात विजय नवनाथने पहिल्या पराभवातून बोध घेत मावळी मंडळाला ४६-२३ असे सहज नमवित बाद फेरी गाठली. अमेय सणस, मयुर खामकर यांच्या चढाया, तर हर्ष लाड याचा बचाव या विजयात महत्वाचा ठरला. मावळीकडून सूरज मगर, चेतन शिंदे यांनी थोडाफार प्रतिकार केला. याच गटात विजय क्लबने देखील मावळी मंडळाला ४९-२९ असे नमवित साखळीतील दुसऱ्या विजया बरोबर बाद फेरी गाठली. राज नाटेकर, झैद कवठेकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. 
रत्नागिरीच्या वाघजाईने उपनगरच्या अंबिकाला ३६-३३ असे चकवीत बाद फेरीतील आपला मार्ग मोकळा केला. अंबिका या स्पर्धेत दोन्ही सामने पराभूत झाल्याने साखळीतच गारद झाली. सिराज कुंभार, शुभम शिंदे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विश्रांतीला २५-०९ अशी आघाडी देणाऱ्या वाघजाईला उत्तरार्धात अंबिकाच्या योगेश जगदाळे, यश जगताप यांनी कडवी लढत देत चुरस निर्माण केली. पण संघाला विजयी करण्यात त्यांना अपयश आले. या गटात जय भारत हा बाद फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला. नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने मुंबईच्या गोलफादेवीला ४१-२१ असे लीलया नमवित आपली आगेकूच केली. अक्षय सुर्यवंशीच्या झुंजार चढाया व विकास काळे, किरण मगर यांचे पोलादी क्षेत्ररक्षण या मुळे हा विजय शक्य झाला. गोलफादेवीकडून अक्षय बिडू, विराज दोलतडे यांनी बऱ्यापैकी प्रतिकार केला. गोलफादेवीने देखील पहिल्या साखळी विजयाने बाद फेरी गाठली आहे. पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने देखील ग गटात मुंबईच्या नवोदित संघाचा ५१-२९ असा लीलया पराभव करीत बाद फेरी गाठली. सुरेंद्र कडलगे, प्रवीण बाबर यांच्या चतुरस्त्र खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. पूर्वार्धात कडवी लढत देणाऱ्या नवोदितच्या प्रणय राणे, तेजस मोरे यांचा खेळ उत्तरार्धात ढेपालला. या पराभवाने त्यांना साखळीतच गारद व्हावे लागले. या गटातून बाद फेरी गाठणारा ठाण्याचा शिवशंकर हा दुसरा संघ ठरला. 
पुण्याच्या राकेशभाऊ घुले मंडळाने उपनगरच्या सत्यमला ३२-३० असे पराभूत करीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवला. विशाल ताटे, गौरव तापकीरे, विजय पाथरे यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सत्यमकडून साहिल नलावडे, सुमित चाळके उत्तम खेळले. राकेशभाऊ संघाला बाद फेर गाठायची असेल तर शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेल किंवा कमी गुणांच्या फरकाने पराभूत व्हावे लागेल. मोरया संघाला बाद फेरी गाठावयाची असेल तर त्यांना मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. लायन्स स्पोर्ट्सने ह गटात उपनगरच्या उत्कर्षाला ४३-१८ असे नमवित बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. आता त्यांना मिडलाईटने विजय मिळवावा म्हणून देव पाण्यात ठेवावा लागेल. यश सायगावकर, सनी होडगे यांच्या झंजावाती खेळाला लायन्स स्पोर्ट्सच्या विजयाचे श्रेय जाते. उत्कर्षकडून राहुल हेगडे, प्रदीप सावंत बरे खेळले.
महिलांच्या अ गटात मुंबईच्या शिवशक्तीने ठाण्याच्या ज्ञानशक्ती महिला संघाला ५४-१९ असे सहज नमविले. या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या शिवशक्तीने पूर्वार्धातच ३१-०९ अशी आश्वासक आघाडी घेत विजय पक्का केला होता. ऋणाली भुवड, अपेक्षा टाकळे, रिया मडकईकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. ज्ञानशक्तीच्या सानिया गायकवाड, निधी राजोळे यांची या सामन्यात मात्रा चाललेली नाही. राजर्षी छत्रपती शाहूने होतकरूला ४०-३३ असे पराभूत करीत बाद फेरीचा आपला मार्ग मोकळा केला. सलग दुसऱ्या पराभवामुळे होतकरूला साखळीतच गारद व्हावे लागले. साधना विश्वकर्मा, ज्योती विश्वकर्मा, भगवती रावल यांच्या चतुरस्त्र खेळाला राजर्षी छत्रपती शाहूच्या विजयाचे श्रेय जाते. सायली यादव, प्राजक्ता पुजारी, नंदीती बाईत यांचा खेळ होतकरूला विजय मिळवून देण्यात कमी पडला. धुळ्याच्या शिवशक्तीने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ३०-२० असा पाडाव करीत साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. शिवशक्तीच्या या विजयात ऋतुजा दोलमाने, ज्योती डफळे, राणी गुप्ता यांचा खेळ महत्वपूर्ण ठरला. महात्मा गांधीच्या स्नेहल चिंदरकर, करीना काणगेकर यांच्या खेळ या सामन्यात बहरला नाही. नवशक्ती स्पोर्ट्सने श्री स्वामी समर्थला ३२-२६ असे पराभूत करीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. ११-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या नवशक्तीने शेवटच्या क्षणी विजयाची किमया केली. वेदांती सपकाळ, विज्योति गोळे, रिद्धी पडवळ यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. श्री स्वामी समर्थच्या अदिती काविलकर, साक्षी जंगम, श्रावणी महाडिक यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही. म्हणूनच त्यांना पराभूत व्हावे लागले. महिलांत अजून बाद फेरी कोण गाठणार हे आजच्या होणाऱ्या चार सामन्यातून निश्र्चित होईल. 

 150 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.