शितल खरटमलची आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घेतली झेप

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिस दलात असलेल्या शितल खरटमलने आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत भरीव कामगिरी करताना विविध दोन स्पर्धामध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकाची कमाई केली आहे.
शितलने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड स्पोर्ट्स अँड हॅन्सी कप कॅम्पो कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे. २४ देशातील खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत तिने वर्चस्व राखताना काता आणि वेपन प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले. तर फाईट प्रकारात मात्र शितलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अमेरिका, किरगिस्तान, मंगोलिया, फ्रांस, इटली, पोलंड, कझाकिस्तान आणि इतर देशांच्या खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेनंतर कझाकिस्तानमध्ये झालेल्या युनायटेड वर्ल्ड कुराश स्पर्धेत शितलने भारताचे प्रतिनिधित्व केले. ५४ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेआधी जागतिक क्रमवारीत शितल नवव्या क्रमांकावर होती. परंतु ज्यूडो मार्शल आर्टस्पर्धामधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांत्मक खेळाच्या अनुभवपणाला लावत शितलने सरस कामगिरी करत थेट पाचव्या क्रमांकावर उडी मारली. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचात आल्यामुळे एकप्रकारे तिच्या नावे वर्ल्ड चॅम्पियन चा ‘किताब जमा झाला आहे. शितलने आपल्या यशाचे सारे श्रेय भाजीपाला विकून तिच्या खेळाच्या सरावाकरता जमापुंजी गोळा करणारे आईवडिल, खेळाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी तांबोळी सर, संघ व्यवस्थापक ओमर मुख्तार, प्रशिक्षक मधुकर पगडे, अमोल साठे यांना देते. शितलच्या या यशाबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक, ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

 1,726 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.