वाहतूक बदलाविरोधात स्थानिक रस्त्यावर

समतानगरसमोरील वळण रस्ता तडकाफडकी बंद – प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा
  
ठाणे : प्रचंड रहदारी वाढलेल्या पोखरण रोड क्रमांक १ वरील समतानगर समोर असलेला ‘यु टर्न’ गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे लोखंडी डिव्हायडर लावून करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीतून समतानगर येथून कॅडबरी जंक्शनकडे जाण्यासाठी अथवा वर्तकनगर येथून येत रेमंड कंपनीसमोर समतानगरकडे वळण घेताना स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या जाचक वाहतूक बदलाबाबत समतानगरवासियांनी आज आवाज उठवला असून गैरसोय चालू…रस्ता बंद अशा घोषणा देत रोष व्यक्त केला. यासोबतच ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्तांना निवेदन देत तात्काळ हे लोखंडी डिव्हायडर हटवून रस्ता पूर्ववत खुला करण्याची मागणी केली. तसेच नागरिकांच्या मागण्यांचा विचार न करता हा बदल केल्यास जनक्षोभ उसळून स्थानिक उग्र आंदोलन करतील, असा इशाराही नागरिकांनी दिला.
समतानगरमधून पोखरण मार्ग क्र. एक येथे बाहेर पडल्यानंतर कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना अटकाव करण्यात आला आहे. याठिकाणी दुभाजक टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे समता नगरमधील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरु आहे. तसेच नागरिकांना वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने समता युथ फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य धुमाळ यांच्या माध्यमातून आज स्थानिकांनी आंदोलन केले. वाहतूक बदल करण्याआधी एक महिना प्रायोगिक तत्वावर वाहतुक वळवुन या प्रभागातील नागरिकांच्या हरकती व सुचना मागवल्या जातात. मात्र तसे न करता दुभाजकाचे काम सुरु केल्याचा आरोप आदित्य धुमाळ यांनी केला. अत्यंत युद्ध पातळीवर कोणाच्या आदेशाने व कोणाचे हित जपण्याकरिता हा घाट घातला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी समता नगर सोसायटीमधील रहिवासी पुरूषोत्तम सहस्त्रबुद्धे, पुष्प पराग सोसायटीचे गावकर, कैलास पार्क गृह संकुलातील लब्दे तसेच समता युथ फाऊंडेशन सदस्य योगेश तेली, दर्शन पड्याळ, नितीश पुजारी, दिपेश सुवर्णा, सतीश अवघडे आदी उपस्थित होते. संबंधित वाहतूक बदल तात्काळ हटवून याठिकाणी रस्ता पूर्ववत करण्यासाठी वाहतूक शाखेला निवेदनही देण्यात आले असून नागरिकांना दिलेल्या पर्यायी वळण रस्त्यामुळे परिसरात कोंडी होत असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले.

 964 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.