मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची पुस्तके वाचा – वेंगसरकर

इतिहास चाळताना तुम्ही मुंबई क्रिकेट मधील खेळाडू, त्यांची कामगिरी, या संघातील खेळलेले महान खेळाडू यांच्याविषयी माहिती घेणे गरजेचे आहे कारण त्यांचा हा इतिहासचं तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा देईल असेही वेंगसरकर यावेळी म्हणाले.

मुंबई : “मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची पुस्तके वाचा” कारण ती तुम्हाला या खेळात अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देतील असे प्रतिपादन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी माहुल, चेंबूर येथील त्यांच्या अकादमीच्या मैदानावर एजिस फेडरल इन्शुरन्स कप या ११ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना सांगितले. मुंबई क्रिकेटचा इतिहास हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम आहे. मुंबई संघाने ४१ वेळा रणजी करंडक स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून जागतिक क्रिकेट मध्ये कुठल्याही संघाला त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हा इतिहास चाळताना तुम्ही मुंबई क्रिकेट मधील खेळाडू, त्यांची कामगिरी, या संघातील खेळलेले महान खेळाडू यांच्याविषयी माहिती घेणे गरजेचे आहे कारण त्यांचा हा इतिहासचं तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा देईल असे ते पुढे म्हणाले. जी.पी.सी.सी. संघाने अंतिम फेरीत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघावर २४ धावांनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना वेंगसरकर तसेच मुंबई महापालिकेचे तांबेवाघ, एजिस फेडरलच्या सिनियर मॅनेजर पूनम कोटियन आणि अराणता गोन्साल्विस, हेमराजसिंग राजपूत, डी.सी.पी., सुहास हेमाडे, ए.सी.पी. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्पूर्वी जी.पी.सी.सी. संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० ओव्हर्समध्ये ९ बाद १९० धावांचे लक्ष्य उभारले. वेदांग मिश्रा (३५) आणि उज्वल माळी (३४) यांनी ६२ धावांची सलामी दिल्यानंतर शार्दूल फगारे याने ३९ चेंडूंतच सहा चौकार आणि एक षटकार ठोकत ६७ धावांची आकर्षक खेळी करून १९० धावांचे लक्ष्य उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या आर्य म्हात्रे (४३/२), अनिश पी. (४०/२) आणि तनिश एम. (२६/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स संघाला २० षटकात ९ बाद १६६ धावांचीच मजल मारता आली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या आदित्य जाधव याने एकहाती किल्ला लढविताना जोरदार फटकेबाजी करीत ५६ चेंडूत १२ चौकारांसह ७६ धावा केल्या. मात्र त्याला अन्य फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. फहाद शेख याने २२ धावांत २ बळी मिळविले. शार्दूल फगारे याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तर उज्वल माळी याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून शार्दूल फगारे, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आर्य म्हात्रे आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून शौर्य नवले यांची निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक – जी.पी.सी.सी. – २० षटकात ९ बाद १९० ( वेदांग मिश्रा ३५, उज्वल माळी ३४, शार्दूल फगारे ६७; आर्य म्हात्रे ४३/२, अनिश पी. ४०/२, तनिश एम. २६/२) विजयी विरुद्ध अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – २० षटकात ९ बाद १६६ ( आर्यन के. २०, आदित्य जाधव ७६, श्राव २५; फहाद शेख २२/२).

 170 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.