परभणी, सांगलीने विजेतेपद राखले

३३वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-लातूर-२०२२.

   लातूर : ३३व्या किशोर,किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत परभणीने किशोर, तर सांगलीने किशोरी गटाचे विजेतेपद पटकाविले.परभणीचा किशोरी संघ अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्यांना संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. गतवर्षी पाथरी-परभणी येथे झालेल्या “३२व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत हेच दोन्ही संघ विजेते ठरले होते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने लातूर जिल्हा कबड्डी संघटनेने महात्मा गांधी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या परभणीने हिंगोलीचा ५०-३२ असा पराभव करीत विजयात सातत्य राखले. सुरुवातच धुव्वादार व आक्रमक करीत परभणीने पूर्वार्धात हिंगोलीवर ३लोण चढवित ३३-१३ अशी आघाडी घेत विजेतेपदाचा आपला दावा पक्का केला होता. उत्तरार्धात सावध खेळ करीत त्यावर कळस चढविला. परभणीच्या या विजयाचे श्रेय संघ भावने बरोबरच सारंग रोकडे याच्या झंजावाती चढाया व ऋषिकेश कदम याच्या भक्कम पकडीला जाते. उत्तरार्धात हिंगोलीच्या दिघु दहातोंडे, रामेश्वर कदम यांनी आपला खेळ गतिमान करीत एका लोणची परतफेड करीत सामन्याची रंगत वाढविण्याचा प्रयत्न केला. पण हिंगोलीला विजयी करण्यास तो अगदीच तोकडा पडला.
 किशोरी गटात देखील गतवर्षाची पुनरावृत्ती झाली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या सांगलीने परभणीचे कडवे आव्हान ५७-४२ असे संपुष्टात आणीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा करंडक उंचावला. या सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस पहावयास मिळाली. सांगलीने विजेतेपदाचे आपली दावेदार पक्की करताना पहिल्या सत्रातच परभणीवर दोन लोण दिले. परभणीने तोडीसतोड उत्तर देत एक लोण परतवीत सामन्यातील रंगत कायम ठेवली. विश्रांतीला ३२-२२ अशी सांगलीकडे आघाडी होती. दुसऱ्या सत्रात सांगलीने आपल्या आक्रमणाची धार  वाढवीत परभणीवर आणखी दोन लोण देत आपली आघाडी वाढवीत नेली. परभणीला उत्तरार्धात देखील एकच लोण परतविता आला. अखेर १५ गुणांच्या फरकाने सांगलीने हा सामना आपल्या बाजूने झुकविला. सांगलीच्या या विजयाचे श्रेय श्रावणी भोसले हिच्या सर्वांगसुंदर आक्रमक चढाया व श्रेया गायकवाडचा भक्कम बचाव याला जाते. परभणीकडून नेहा राठोड, धनश्री चव्हाण यांनी चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ करीत शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजया समीप नेण्यास त्या अपयशी ठरल्या.
या अगोदर झालेल्या किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात परभणीने गतउपविजेत्या नंदूरबारला २७-२३ असे, तर हिंगोलीने अहमदनगरला ३७-२९ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. किशोरी गटात सांगलीने मुंबई उपनगरवर ४३-३३ अशी, तर परभणीने नाशिकवर ३८-३२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली होती

 153 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.